वर्दळीचा रस्ता गेला खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 02:39 AM2018-07-27T02:39:32+5:302018-07-27T02:39:52+5:30
प्रवासासाठी धोकादायक बनला रस्ता
दावडी : खरपुडी खुर्द (ता. खेड) येथील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा व वर्दळीचा मार्ग असलेला खरपुडी ते शिरोली फाटा हा रस्ता सातत्याने दुर्लक्षीत व डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत राहिला आहे. परिणामी या मार्गावर अनेक जीवघेणे अपघात घडले आहेत. पावसाळ्यात रस्त्यातील सर्व खड्डे पाण्याने भरुन त्यांना तळ्याचे स्वरुप आल्याने हा मार्ग अधिकच धोकादायक व जीवघेणा बनला आहे. त्यामुळे अपघातात वाढ झाली आहे.
पावसाच्या सुरुवातीला खड्यामुळे रस्ता हा पाण्यात हरविल्याची परिस्थिती दिसून आल्याने मुसळधार पावसात काय होईल? या विचारात ग्रामस्थ, वाहन चालकांंमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. रस्त्यात जागोजागी पाणी साचल्याने मोठ्या वाहनांनी उडणारे पाण्याचे फवारे पादचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून झालेल्या रस्त्याच्या भयाण दुरवस्था झाली आहे. पाणी वाहून जाण्यासाठी दोन्ही बाजुने गटारे नसल्यामुळे या रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याचे चित्र दिसत आहे. दरवर्षी पावसाळ्यात प्रवासी, देवाच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांना, ग्रामस्थ व वाहनचालकांना या जीवघेण्या मार्गावरुन जीवनमरणाशी संघर्ष करीतच काढावा लागत आहे.
प्रवासासाठी धोकादायक बनला रस्ता
हा रस्ता प्रवास करण्यासाठी अत्यंत धोकादायक झाला आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी यांच्याकडूनही दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थाकडून संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत.
अशा खड्डेमय मार्गांमुळे खरपुडी ते शिरोली फाटा हा केवळ पंधरा मिनिटाचा प्रवास अर्धा तासावर गेला आहे. तसेच खरपुडी गावात प्रति जेजुरी म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध असे खंडोबा मंदिर आहे. येथे नेहमी भाविकांची गर्दी असते. या रस्त्याच्या अश्या दुरवस्थेमुळे येणाºया नागरिकांचे हाल होत आहे.