राजगुरूनगर (पुणे) :मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ खेड तालुक्यातील मराठा समाजाच्या तरुणांनी पुणे- नाशिक महामार्गावर चांडोली (ता. खेड ) येथे (दि. १७) सकाळी रास्ता रोको केला. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी व मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मराठा मोर्चातील तरुणांनी केली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी म्हणून जरांगे पाटील लढा देत असून गेल्या काही दिवसांपासून ते अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. तरी सरकार मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करीत नाही याचा निषेध म्हणून खेड तालुका मराठा क्रांती मोर्चा व तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा युवकांनी मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ चांडोली येथील येथे महामार्ग रोखून आंदोलन केले. सुमारे तासभर रास्ता रोखल्यामुळे दोन्ही बाजूने वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. सुदाम कराळे, मंगेश सावंत, विकास ठाकूर शंकर राक्षे, ॲड. अनिल राक्षे, मनोहर वाडेकर, हनुमंत कड यांनी मार्गदर्शन केले. बाजार समितीचे सभापती कैलास लिंबोरे, अंकुश काळे, दिलीप होले, निवृत्ती नाईकरे, संदेश पाचारणे, शुभम बालघरे, अनिल नाईकरे, नवनाथ बोरकर, सतीश तनपुरे, बबन होले, अमोल होले, शुभम गाडे, राकेश चव्हाण, जीजाभाऊ मेंदगे, अक्षय भगत आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी तरुणांनी सरकारविरोधात घोषणा देत सरकारने जरांगे यांच्या आंदोलनाची दखल घेऊन तत्काळ मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत तोडगा काढावा, अशी मागणी केली.
पुढील काळात मनोज जरांगे यांना काही झाल्यास त्याला सरकार जबाबदार राहील व त्यानंतर महाराष्ट्रातील रस्त्या-रस्त्यांवर आंदोलने केली जातील,शिवजयंतीच्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे, उपनिरीक्षक सागर खबाले, पोलिस हवालदार संतोष घोलप, सुनील बांडे, अर्जुन गोडसे यांच्यासह पोलिसांनी चोक बंदोबस्त ठेवला होता.