मुसळधार पावसामुळे पुणे-सातारा महामार्गावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने तर निकृष्ट कामामुळे खड्डे पडले आहेत. उड्डाणपुलावरही खड्डे असून पुलाची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. भोर फाट्यावर कापूरव्होळ येथे असलेल्या कमी उंचीच्या उड्डाणपुलामुळे रस्ता खोदून उंची वाढवली आहे. यामुळे दर पावसाळ्यात गुडघाभर पाणी साचते या पाण्यामुळे दोन तीन फुटांचे खड्डे पडले आहेत. याकडे महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष होत आहे. भोर-महाड रस्ता व नीरा देवघर धरणांर्तगत असलेल्या रिंगरोडवर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी दरडी पडून रस्ता खचला साईडपट्ट्या दगड माती गाळाने भरल्या आहेत. अनेक मोऱ्या, पूल वाहून गेले आहेत. यामुळे काही गावांतील वाहतूक बंद झाली आहे.
--
चौकट
भोर, पसुरे, पांगारी, माळवाडी, मळे, भुतोंडे, भोर, आंबाडखिड, मांढरदेवी, आंबवडे, कोर्ले, रायरेश्वर, भोर कर्नावड, चिखलगाव, भोर आंबेघर, करंजे, कारी तसेच पूर्व भागातील सारोळे भोंगवली कासुर्डी ते हातवे नसरापूर या सर्व रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्ता खचणे, वाहून जाणे, दरडी पडणे यामुळे तालुक्यातील सर्वच रस्त्याची चाळण झाली आहे. यामुळे सर्वच रस्त्यावरील प्रवास धोकादायक झाला असून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावरील दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे.
--
फोटो १२ भोर तालुका रस्ते
फोटो ओळी : भोर-महाड रस्त्यावर खड्डेच खड्डे