पुणे : सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करत ज्येष्ठ नागरिकाच्या घरात शिरुन लॅपटॉप, मोबाईल, बँकेची कागदपत्रे ताब्यात घेतली. त्यानंतर या नागरिकाचे अपहरण करुन त्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हवेली तालुक्यातील कोरेगाव मुळ गावातील एका ६२ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिकाच्या इमारतीत राहणारी रेश्मा शेख व एक जण १२ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजता त्यांच्या घरात शिरले. आम्ही सीबीआयचे अधिकारी असल्याची त्यांनी बतावणी केली. घरातील लॅपटॉप, मोबाईल, मोटारीचे स्टार्टर, कागदपत्रे व बँकेचे कागदपत्रे असा ३१ हजार रुपयांचा माल घेतला.
त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांना जबरदस्तीने गाडीत बसवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दमदाटी करुन आम्हाला दीड लाख रुपये द्या नाही तर तुमच्यावर खोटी केस करतो. तसेच जीव मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांना खेड शिवापूर येथे सोडून ते पळून गेले. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.