बारामतीत महिलेचे हातपाय बांधून कोटींचा दरोडा; ज्योतिषाकडून काढला होता मुहूर्त, ६ जण जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 07:36 PM2023-08-21T19:36:33+5:302023-08-21T19:36:47+5:30
पती तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेल्यावर महिला २ मुलांसह घरात असताना चोरटयांनी टाकला दरोडा
बारामती : एप्रिल महिन्यात शहर परीसरातील देवकातेनगर परीसरात एका कुटुंबातील एका महिलेचे महिलेचा हात-पाय बांधत तिला मारहाण करीत १ कोटी ७ लाखांचा दरोडा सुमारे साडेतीन महिन्यांनंतर उघडकीस आला आहे.पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी सहाजणांना अटक केली आहे.ज्योतिषाकडून मुहुर्त काढुन आरोपींनी हा गुुन्हा केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन अशोक जगधणे (वय ३०, रा. गुणवडी, २९ फाटा, ता. बारामती), रायबा तानाजी चव्हाण (वय ३२, रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर), रविंद्र शिवाजी भोसले (वय २७, रा. निरावागज, बारामती), दुर्योधन उर्फ दिपक उर्फ पप्पू धनाजी जाधव (वय ३५, रा. जिंती हायस्कूलजवळ, ता. फलटण, जि. सातारा), नितीन अर्जून मोरे (वय ३६, रा. धर्मपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्यासह रामचंद्र वामन चव्हाण (वय ४३, मूळ रा. आंदरुड, ता. फलटण, जि. सातारा, सध्या रा. वडूज, ता.खटाव, जि. सातारा) अशी या दरोड्यातील आरोपींची नावे आहेत.
देवकातेनगर येथे सागर शिवाजी गोफणे व त्यांची पत्नी दोन मुलांसह राहतात. दि. २१ एप्रिल रोजी सागर हे तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेले होते. तर त्यांची पत्नी व मुले घरी होती. यावेळी रात्री आठ वाजता अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या कंपाऊंडवरून प्रवेश केला. पत्नीला मारहाण करत त्यांचे हात-पाय बांधले. तोंडात कापडाचा बोळा कोंबून घरात प्रवेश केला होता. ९५ लाख ३० हजाराची रोख रक्कम, ११ लाख ५९ हजार रुपयांचे २० तोळे दागिने, ३५ हजार रुपयांचा मोबाईल असा १ कोटी ७ लाख रुपयांचा ऐवज जबरीने चोरून नेला होता. याबाबत अज्ञातांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात दरोड्यााच गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेमुळे बारामती शहरात खळबळ उडाली होती. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी हे स्वत: या तपासाबाबत लक्ष ठेवुन होते. त्यानुसार पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेची पथके नेमली होती. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय खबरीच्या आधारे अखेर दरोडेखोरांना जेरबंद करण्यात आले. विशेष म्हणजे आरोपींनी आपण पकडले जावू नये, याची पुरेपुर खबरदारी घेतली होती. कोणताही मागमूस मागे ठेवला नव्हता. या गुन्ह्यातील आरोपी एमआयडीसीतील मजूर असल्याची माहिती मिळाल्यानंतर संशयितांवर बारकाईने नजर ठेवण्यात आली. वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
या घटनेत अद्यापपर्यंत पोलिसांनी ७६ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यात ६० लाख ९७ हजाराची रोख रक्कम असून १५ लाख ३५ हजार रुपये किमतीचे २६ तोळ्याचे दागिने हस्तगत करण्यातआले आहेत.