बारामतीः महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्याची नवी जोडी उदयाला येत असल्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा पुतण्या रोहित पवारनं काकाच्या बचावासाठी जोरदार बॅटिंग केली आहे. अजित पवार हा राजकारणातील टाकाऊ माल आहे, अशी बोचरी टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना रोहितनं रोखठोक प्रत्युत्तर दिलंय.
'उद्धव ठाकरे कधी लोकांच्यातून निवडून आले नाहीत की मातोश्रीच्या बाहेर पडून उभा महाराष्ट्र पाहण्याचं देखील साधं कष्ट घेतले नाहीत. महाराष्ट्र जळत असताना हे महाशय सत्तेत भागीदार होऊन सर्वसामान्यांना भुलवण्याचं काम करत आहेत. इतका लेख (अजित पवारांविरोधातील संपादकीय) लिहिण्याऐवजी दोन ओळींचा राजीनामा दिला असता तरी आपल्या वडिलांप्रमाणे आपला ताठ कणा महाराष्ट्राला पहायला मिळाला असता', असा टोला रोहित पवारनं फेसबुकवरून लगावला आहे.
बाळासाहेब अखेरच्या क्षणी म्हणाले होते, आमच्या उद्धवला सांभाळा! त्या 'सांभाळा'चा अर्थ काल समजला. आमचा मुलगा अल्लड आहे त्याला सांभाळून घ्या, असंच त्यांना म्हणायचं असेल, अशी चपराक रोहितनं लगावली आहे.
काय म्हटलं होतं 'सामना'च्या अग्रलेखात?
'काय तर म्हणे, 25 तारखेला अयोध्येला जाणार. काय तिथं दिवा लावणार! अरे तुला तुझ्या बापाचं स्मारक पाच वर्षात करता आलं नाही. तिथं अयोध्येत जाऊन काय करणार आहे?, अशी बोचरी टीका अजित पवार यांनी जाहीर सभेत केली होती. त्याचा खरपूस समाचार 'सामना'च्या अग्रलेखातून घेण्यात आला होता. अजित पवार या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही. अजित पवार हा महाराष्ट्राच्या राजकारणातील टाकाऊ माल आहे. काकांच्या पुण्याईने व कृपेनेच ते तरले आहेत. हे महाशय अधूनमधून शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळी परिस्थिती यावर त्यांच्या ‘मुतऱ्या’ थोबाडाने बोलत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस हा आजही शरद पवारांच्या करंगळीवर तरलेला एकखांबी तंबू आहे. या तंबूचा कळस म्हणजे अजित पवारांची रिकामी खोपडी आहे. आम्ही त्या खोपडीस किंमत देत नाही, असा हल्लाच त्यांनी चढवला होता. त्यावर, अजित पवार यांनी पलटवार केला होता. शिवसेना आणि त्यांचं नेतृत्व बावचळलंय, सत्तेत असलेल्यांनी निर्णय घ्यायचे असतात, पण शिवसेना नुसती मागण्या करतेय, असं त्यांनी सुनावलं होतं. आता रोहित पवार आपल्या काकांच्या बचावासाठी मैदानात उतरला आहे.
कोण आहे रोहित पवार?
रोहित पवार हा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा नातू. पवारांचे पुतणे राजेंद्र पवार यांचा रोहित हा मुलगा आहे, म्हणजेच अजित पवारांचा तो पुतण्या आहे. रोहित सध्या बारामती जिल्हा परिषदेत सदस्य आहे.