आळंदीतून माऊलींच्या चलपादुकांचे पंढरीकडे शाही प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:08 AM2021-07-20T04:08:58+5:302021-07-20T04:08:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भानुदास पऱ्हाड आळंदी : फुलांची आकर्षक सजावट... रांगोळीच्या पायघड्या.... माऊलीनामाचा जयघोष.... आकाशातून पुष्पांचा वर्षाव.... अशा उत्साही ...

Royal departure of Mauli's Chalapadukas from Alandi to Pandharpur | आळंदीतून माऊलींच्या चलपादुकांचे पंढरीकडे शाही प्रस्थान

आळंदीतून माऊलींच्या चलपादुकांचे पंढरीकडे शाही प्रस्थान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

भानुदास पऱ्हाड

आळंदी : फुलांची आकर्षक सजावट... रांगोळीच्या पायघड्या.... माऊलीनामाचा जयघोष.... आकाशातून पुष्पांचा वर्षाव.... अशा उत्साही वातावरणात तीर्थक्षेत्र आळंदीतून माऊलींच्या चांदीच्या चलपादुका तब्बल १७ दिवसांचा आजोळघरातील मुक्काम उरकून सोमवारी (दि. १९) सकाळी सव्वानऊच्या सुमारास मोजक्या वारकऱ्यांसमवेत पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. इतिहासात सलग दुसऱ्या वर्षी आषाढी वारी बसद्वारे पंढरीला गेल्याने भाविकांना लांबूनच माऊलींना निरोप द्यावा लागला आहे. ज्ञानोबा-तुकारामांच्या गजरात आषाढी बसवारी सोहळा पोलीस बंदोबस्तात आजोळघरापासून नगरपालिका चौकातून इंद्रायणीच्या नवीन पूलमार्गे पंढरीला रवाना झाला. या वेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

तत्पूर्वी, सोमवारी (दि. १९) पहाटे घंटानाद झाल्यानंतर आजोळघरात माऊलींच्या पादुकांना पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे-पाटील यांच्या हस्ते पवमान अभिषेक, दुधारती व महापूजा करण्यात आली. तर प्रमुख ब्रम्हवृंदाच्या हस्ते माउलींच्या संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पोशाख करण्यात आला. सकाळी सातच्या सुमारास आजोळघरात माऊलींच्या चलपादुकांसमोर दैनंदिन मानाची कीर्तनसेवा पार पडली.

दरम्यान, गरुड कुटुंबीयांनी फुलांनी सजविलेल्या दोन्ही विशेष बस पोलीस बंदोबस्तात आजोळ घराबाहेर आणून सज्ज करण्यात आल्या. त्यानंतर निमंत्रित वारकऱ्यांना सॅनिटाईज करून बसमध्ये प्रवेश दिला. सकाळी नऊच्या सुमारास कर्ण वाजल्यानंतर माऊलींना नैवैद्य दाखविण्यात आला. मालक बाळासाहेब आरफळकर यांनी चलपादुका उचलून घेताच टाळ-मृदंगाच्या गजरात ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’ असा जयघोष करण्यात आला.

हरिनामाच्या गजरात पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर यांच्या हस्ते माऊलींच्या पादुका बसमध्ये फुलांनी सजविलेल्या पहिल्या खुर्चीवर विराजमान करण्यात आल्या. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. विकास देशमुख, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, सोहळाप्रमुख विकास ढगे पाटील, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर आदी मान्यवरांच्या हस्ते बसचे विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर इंद्रायणीच्या नवीन पूलमार्गे माऊलींची बस पंढरीला रवाना झाली.

चौकट :

कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाने सलग दुसऱ्या वर्षी आषाढी पायीवारी सोहळा रद्द करून प्रातिनिधिक स्वरूपात बसवारीद्वारे सोहळा आयोजित केला आहे. या दरम्यान शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून हा सोहळा संपन्न करण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार मानाच्या पालख्या विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे १.५ किमी. अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायी वारी संपन्न झाली.

फोटो ओळ : तीर्थक्षेत्र आळंदीतून सोमवारी (दि. १९) सकाळी सव्वानऊच्या सुमारास माऊलींच्या चांदीच्या चलपादुका घेऊन आषाढी बसवारी शाही थाटात पंढरीला विठ्ठलाच्या भेटीला रवाना झाली. (छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)

२) आजोळघरी तब्बल सतरा दिवस मुक्कामी असलेल्या माऊलींच्या चलपादुका सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांनी उचलून घेतल्यानंतर माऊलींचा जयघोष करण्यात आला.

३) पंढरपूर प्रस्थानपूर्वी माऊलींच्या चलपादुकांना अभिषेक घालताना सोहळाप्रमुख अॅड. विकास ढगे पाटील.

४) आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी साकारण्यात आलेले माऊलींचे गोड रूप.

Web Title: Royal departure of Mauli's Chalapadukas from Alandi to Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.