Pune Railway Station: पुणे रेल्वे स्टेशनवर 'आरपीएफ जवानच' करतात प्रवाशांची लूटमार

By नितीश गोवंडे | Published: August 18, 2022 12:18 PM2022-08-18T12:18:38+5:302022-08-18T12:18:58+5:30

अन्याय करणारे खाकीतील हे लोक नको; प्रवाशांची संतप्त प्रतिक्रिया

RPF soldiers rob passengers at Pune railway station | Pune Railway Station: पुणे रेल्वे स्टेशनवर 'आरपीएफ जवानच' करतात प्रवाशांची लूटमार

Pune Railway Station: पुणे रेल्वे स्टेशनवर 'आरपीएफ जवानच' करतात प्रवाशांची लूटमार

googlenewsNext

पुणे : रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांचा विश्वास हा रेल्वेतीलपोलिसांवर असतो. पण हेच पोलीस जर प्रवाशांची लूटमार करत असतील तर प्रवाशांनी दाद मागायची कुणाकडे, असा सवाल उपस्थित होतो. पुण्याहून हावड्याला जाणाऱ्या आझाद हिंद एक्स्प्रेसच्या जनरल बोगीमध्ये मंगळवारी मध्यरात्री हा प्रकार घडला.

आझाद हिंद एक्स्प्रेस दररोज पुण्याहून संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास निघते. मंगळवारी (१६ ऑगस्ट) मात्र ही रेल्वे मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास प्लॅटफॉर्म नं. १वर यार्डातून आली. यावेळी जनरल तिकीट घेऊन प्रवासासाठी निघालेले प्रवासी डब्यात जाताच आधीपासूनच आत बसलेल्या आणि स्वत:ला रेल्वे पोलीस आहोत, असे सांगणाऱ्या ५ ते ६ जणांनी प्रवाशांना प्रवास करायचा असेल तर ३०० रुपये द्या अन्यथा बाहेर फेकून देऊ, अशी धमकी देण्यास सुरुवात केली. यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी त्यांना पैसे दिले. पैसे घेऊन हे आरपीएफ जवान प्लॅटफॉर्मवर उतरून निघून गेले. यानंतर काही प्रवाशांनी प्लॅटफॉर्मवर असलेल्या आरपीएफच्या कर्मचाऱ्यांना याबाबत सांगितले असता, पी. डी. चौधरी नामक कर्मचाऱ्याने तुमच्या तक्रारीवरून काही होणार नाही, असे उलटे धमकावले.

महिलांशी अश्लील भाषा...

काही महिलांनी डब्यात आधीपासून असलेल्या साध्या वेशातील आरपीएफला पैसे देण्यास विरोध केला असता त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत रेल्वेतून फेकून देण्याची धमकी देण्यात आली. यामुळे घाबरून या महिलांनीही त्यांना पैसे दिले. दरम्यान, हे लोक दारू प्यायलेले असल्याचेदेखील प्रवाशांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

हे रेल्वे अधिकारी आणि आरपीएफचे संगनमत...

घडलेला प्रकार अतिशय गंभीर असून, दररोज असा प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचे प्लॅटफॉर्मवरील व्यावसायिकांनी सांगितले. यामध्ये रेल्वे अधिकारी आणि आरपीएफ यांचे संगनमत असून, मुद्दाम काही ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आलेले नाहीत, जेणेकरून यांचा गोरख धंदा असाच सुरू राहील, याची काळजी घेतल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

दहशतवादी थेट मारून टाकतात; पण हे खाकी वर्दीतील गुंड न परवडणारे आहे. पी. डी. चौधरी नामक आरपीएफ जवानाने मला तुमच्या तक्रारीने काही होणार नाही, सगळ्यांनी तक्रार दिली तरच आम्ही कारवाई करू शकतो, असे सांगितले. एक किंवा दहा तक्रारी काय फरक पडतो. त्यामुळे आरपीएफ जवानांनी कारवाई करणे गरजेचे होते, अशी आपबिती एका प्रवाशाने ‘लोकमत’कडे सांगितली.

हा प्रकार मला माहीत नव्हता. बरे झाले तुम्ही माझ्या कानावर घातले, आम्ही सीसीटीव्ही बघून योग्य ती कारवाई करू. - उदयसिंग पवार, वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त

‘लोकमत’चे पुणे रेल्वे विभागाला प्रश्न..

१) रेल्वे जर यार्डातून प्लॅटफॉर्मवर आली तर आधीपासून जनरल डब्यात लोक कसे?
२) एक प्रवासी का होईना तक्रार करायला पुढे आला होता तर आरपीएफने गुन्हा दाखल करून कारवाई का केली नाही?
३) सीसीटीव्ही संपूर्ण प्लॅटफॉर्म कव्हर होईल, प्लॅटफॉर्मवरील प्रत्येक हालचाली दिसतील असे का लावलेले नाहीत?
४) आरपीएफ आणि जीआरपीकडे रेल्वेसह प्रवाशांची जबाबदारी असताना आरपीएफच प्रवाशांची लूटमार करत असतील तर प्रवाशांनी तक्रार कुणाकडे करायची?
५) आरपीएफ आणि रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोणती पावले उचलणार?
६) परप्रांतीय लोकांकडून अशा धमक्या देऊन पैसे उकळणे योग्य आहे का?
७) एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना खाकी वर्दीचेच लोक प्रवाशांची लूटमार करत असतील तर अजून किती वर्षे हा अत्याचार सुरू राहील?

Web Title: RPF soldiers rob passengers at Pune railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.