चोरीच्या आरोपामुळे रुबीतील कर्मचाऱ्याची आत्महत्या
By admin | Published: August 26, 2015 04:33 AM2015-08-26T04:33:40+5:302015-08-26T04:33:40+5:30
चोरीच्या खोट्या आरोपामुळे वैतागलेल्या रुबी रुग्णालयातील कर्मचाऱ्याने राहत्या घरी नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता ताडीवाला
पुणे : चोरीच्या खोट्या आरोपामुळे वैतागलेल्या रुबी रुग्णालयातील कर्मचाऱ्याने राहत्या घरी नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता ताडीवाला रस्ता भागात ही घटना घडल्यानंतर मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला. या वेळी संतप्त कुटुंबीयांसह नागरिकांनी दोषी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी व मृताच्या पत्नीस नोकरी द्यावी, अशी मागणी केली. या वेळी जमावाने घोषणाबाजी केल्याने व मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा दिल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. दुपारी ४ वाजता रुबी व्यवस्थापनाकडून लेखी स्वरूपात आश्वासन मिळाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्याचे मृताच्या नातेवाइकांनी मान्य केले.
मोहन प्रकाश सोनवणे (३६, रा. ताडीवाला रोड) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. ते रुबी रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागात आॅफिसबॉय म्हणून कामास होते. ४ आॅगस्ट रोजी मोहन यांनी एका कपाटातून दोन लाख रुपये चोरल्याचा आरोप रुग्णालयातील कॅथलॅबमधील कर्मचारी रघुनाथ कुचिक यांनी केला. पण, काही दिवसांतच कुचिक यांना पैसे कपाटाच्या खाली सापडले. त्याची माहिती रुग्णालय प्रशासनाला देण्यात आली होती. मात्र, काही कर्मचाऱ्यांकडून व सुरक्षा यंत्रणेकडून मोहन यांना मानसिक त्रास झाल्याने वैतागून त्यांनी गळफास घेतला, असा आरोप मोहन यांच्या नातेवाइकांनी केला. मंगळवारी सकाळी घडलेल्या या घटनेनंतर नातेवाइकांनी रुग्णालयातून मृतदेह ताब्यात न घेतल्याने तणाव निर्माण झाला. परिसरातील राजकीय नेत्यांसह कुटुंबीयांची व्यवस्थापनाशी बोलणी सुरू होती. दुपारी ४ पर्यंत व्यवस्थापनाकडून दाद मिळाली नाही. मृताच्या नातेवाइकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने रुग्णालयाच्या प्रशासनाकडून मृताच्या कुटुंबीयांना लेखी स्वरूपात आश्वासन मिळाल्याने मृतदेह ताब्यात घेण्याचे मान्य करण्यात आले. स्थानिक नगरसेवक प्रदीप गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते राहुल तायडे, दलित पँथरचे सुखदेव तात्या सोनवणे, प्रकाश साळवी, स्वीकृत सदस्य सुजित यादव, जोगदंड, मनसे युवा नेते धनंजय कांबळे, भीमछावा संघटनेचे अध्यक्ष श्याम गायकवाड, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळेंसह परिसरातील सामाजिक कार्यकर्ते होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून या कार्यकर्त्यांची समजूत काढली. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली.
बंडगार्डन पोलीस निरीक्षक मदन बहाद्दरपुरे, निरीक्षक अजित चौधरींसह व्यवस्थापनाकडून बनसोडे आणि इराणी हे दोघे सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीस आले होते. इतकी रक्कम एखाद्या कर्मचाऱ्याकडे कशासाठी, पैसे रुग्णालयात ठेवण्याचे कारण काय, पैसे ज्याचे जातात त्याच्याच जवळच्या व्यक्तीला सापडतात कसे काय आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या वेळी सर्वपक्षीयांनी केली. (प्रतिनिधी)
राजकीय करिअर खराब करण्याचा प्रयत्न
शिवसेनेच्या कामगार आघाडीचे प्रमुख रघुनाथ कुचिक यांनी दुपारी बंडगार्डन पोलीस ठाण्यात जाऊन जबाब नोंदविला. ते म्हणाले, ‘‘गेली २५ वर्षे आपण या रुग्णालयात काम करतो. मी शिवसेनेचा नेता असल्याने माझ्यावर आरोप करणारे माझे राजकीय करिअर खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मोहन यांच्या मृत्यूस कोण कारणीभूत आहे, याची चौकशी करण्याची मागणी मी करीत आहे.’’
कुचिक म्हणाले, ‘‘पैसे चोरीला गेल्यानंतर मी रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थापनाकडे याची चौकशी करावी, अशी लेखी मागणी केली होती. त्यानंतर चोरीस गेलेल्या पैशांपैकी काही पैसे ड्रॉवरखाली आढळले. उरलेल्या पैशांबाबत ४० जणांची सुरक्षा यंत्रणेकडून चौकशी सुरू होती. मी त्या अर्जात कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नव्हता. त्यामुळे अन्य काही कारण आहे का, याची चौकशी केली पाहिजे. मी कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार आहे.’’