पुणे: ऐतिहासिक व सांस्कृतिक राजधानी असलेल्या या पुणे शहरात यापूर्वीची विकासकामे नियोजनबद्धपणे केली जात होती. महापालिकेत नाकर्ते भाजप सत्तेवर आल्यापासून कुठल्याही कामाबाबत वेगवेगळ्या विभागात समन्वय राहीला नाही. त्यामुळे शहरातील विकासकामांचा बोजवारा उडाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
आज पुणे शहरातील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी ,कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचा ७ वा वेतनअयोग मिळवून देण्यासाठी, कुंभकर्णाप्रमाणे झोपलेल्या सत्ताधारी भाजपला जागे करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीद्वारे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.
कोरोना नियमांना धाब्यावर ठेवत सोशल डिस्टनसींगच्या नावाखाली मनमानी कारभार करत असल्याचे स्पष्ट चित्र आंदोलनातून दिसून आले.
रस्ते खोदण्याचे काम पूर्ण करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे नियोजन नाही. रस्ता खोदून ठेवला की ठेकेदाराची यंत्रणा ८-८ दिवस फिरकत सुद्धा नाही, या काळात जर अपघात झाले तर याला कोण जबाबदार असेल? हीच आहे का भाजपची स्मार्ट सिटी? होर्डिंग्ज जितके चांगले रंगवतात तितके चांगले रस्ते का नाहीत? किती दिवस टॅक्स रुपी गोळा झालेला नागरिकांचा पैसा खड्डड्यात घालणार का? असा प्रश्नही आंदोलकर्त्यानी यावेळी उपस्थित केला.
पुणे शहराचा पावसाळ्यात ओढे नाले कधीही तुंबले नाही. गेल्या वर्षी मात्र आंबील ओढ्यालगतच्या भागात जवळपास एक मजला पाण्याखाली गेला. कित्येक संसार वाहून गेले, काही जीवितहानी देखील झाली. हे सगळं कुणामुळे घडले. महापालिकेने का नालेसफाई केली नाही. अशी विचारणा त्यांनी केली आहे?
प्रत्येक विभागात महापालिकेचे अपयश दिसून येत आहेत. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना जनतेची काळजी आहे की ठेकेदारांची? हे त्यांनी एकदा पुणेकरांना सांगावे. येत्या काही दिवसांत जर सत्ताधारी भाजपने पुणेकरांची या त्रासातून मुक्तता केली नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भविष्यात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाले आहेत.