मुंढवा : कोरेगाव पार्क परिसरातील भैरोबा पंपिंग स्टेशन स्मशानभूमीत नागरिकांना दहावा विधीला काकस्पर्श अपेक्षित असतो. परंतु येथे मात्र ठेवलेल्या पिंडाला आता डुक्करस्पर्श होताना पाहायला मिळत आहे. या घटनेमुळे येथे विधीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या भावना दुखावल्या जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यासाठी या डुकरांचा कायमचा बंदोबस्त करावा, यासाठी पुणे कँन्टोन्मेंट ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने ढोले-पाटील क्षेत्रीय कार्यालयात सहायक आयुक्त अरुण खिलारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय कवडे, पुणे कॅन्टोन्मेंट ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप परदेशी, राजेश गायकवाड उपस्थित होते. कोरेगाव पार्कमधील स्मशानभूमीत डुकरांचा मुक्त वावर व उच्छाद सुरू आहे. दशक्रिया करीत असताना काकस्पर्श होण्यासाठी त्या पिंडाला डुकरेच स्पर्श करीत आहेत. तो नैवेद्य फस्त करतानाचे चित्र वारंवार पाहायला मिळत आहे. या कृत्यामुळे उपस्थित नातेवाईकांच्या भावना दुखावल्या जात असल्याने नागरिक शोकांतिका व्यक्त करीत आहे. यासंदर्भात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय कवडे म्हणाले, की या स्मशानभूमीलगतच डुक्करपालन व्यवसाय सुरू आहे. हा व्यवसाय कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे. ही जागा अंत्यविधीसाठी आहे का डुक्कर पालनासाठी. पुणे महानगरपालिकेने डुकरे पकडण्यासाठी ७६ लाखांची तरतूद कशासाठी केली आहे. अस्तित्वात किती डुकरे महानगरपालिकेने पकडली, याची आकडेवारी त्यांनी प्रसिद्ध करावी. महानगरपालिकेने तत्काळ या डुकरांचा बंदोबस्त करावा, अन्यथा ही डुकरे मनपा आयुक्त व क्षेत्रीय कार्यालयात सोडण्यात येतील.काय आहे स्मशानभूमीतील सद्य:स्थिती?कोरेगाव पार्क परिसरातील भैरोबा पंपिंग स्टेशन येथे स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीचा वापर घोरपडी गाव, बी. टी. कवडे रोड व कोरेगाव पार्क परिसरातील रहिवासी करीत असतात. या स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणावर डुकरांचे साम्राज्य पाहायला मिळते.या डुकरांमुळे येथे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरलेली आहे. याच परिसरात डुक्कर पाळण्याचा प्रकार सुरू आहे. याच कारणामुळे येथील डुकरे विधीच्या वेळी उच्छाद मांडत आहेत. महानगरपालिकेने नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन या डुकरांचा बंदोबस्त करण्याची नितांत गरज आहे.