पुणे :बालसाहित्य लिहिणा-या लेखकांची संख्या कमी आहे. कुमार वयांच्या मुलांसाठी साहित्य निर्माण केले जात नाही अशी एकीकडे ओरड केली जाते. मात्र, दुसरीकडे सातत्याने मुलांसाठी विविध विषयांवर लेखन करणा-या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या एका बालसाहित्यकाराला मात्र ‘प्रकाशक’च मिळेना अशा दयनीय अवस्थेला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. त्यांच्या ३५ पुस्तकांची मूळ हस्तलिखिते लिहून तयार आहेत.परंतु, त्यांच्यासाठी चांगला प्रकाशक मिळणे ही दुर्मिळ गोष्ट झाली आहे. कुणी प्रकाशक देता का प्रकाशक? अशी आर्त विनवणी या बालसाहित्यकाराला करावी लागत आहे. यातूनच बालसाहित्याबाबतची प्रकाशकांची उदासीनता आणि बालसाहित्याला दिले जाणारे दुय्यम स्थान दिसून येत आहे.राजीव तांबे हे त्या सर्जनशील बालसाहित्यकाराचे नाव! त्यांची आत्तापर्यंत ८९ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. बालवाडमयात त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटविला आहे. बालसाहित्याव्यतिरिक्त एकपात्रिका, कथा,कादंबरी,विज्ञान प्रयोग, गणित कथा, पालक आणि शिक्षकांसाठी लेखन असे विविध प्रकार त्यांनी हाताळले आहेत. ’गंमतशाळा’ या अभिनव संकल्पनेची निर्मिती त्यांनी केली आहे. राज्य आणि केंद्र स्तरावरच्या पुरस्कारांचेही ते मानकरी ठरले आहेत. पुण्यात झालेल्या २५ व्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले आहे. त्यांच्या संपूर्ण बालसाहित्यातील योगदानाबददल त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. साहित्य क्षेत्रात इतके उत्तुंग कार्य असतानाही त्यांना पुस्तकांसाठी प्रकाशकच मिळत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना प्रसिद्ध बालसाहित्यिक राजीव तांबे म्हणाले, माझी ३५ पुस्तकांची हस्तलिखिते संगणकावर लिहून तयार आहेत. मात्र पुस्तकांच्या प्रकाशनासाठी प्रकाशक आणि चित्रकारच मिळत नाही अशी स्थिती आहे. ‘पुस्तक काढली तरी वाचणार कोण? अशी उत्तर प्रकाशकांकडून मिळत असल्याने चांगला प्रकाशक मिळणे ही दुर्मिळ बाब झाली आहे. पण तरीही माझे लेखन थांबलेले नाही. रोज सहा तास मी लेखन करतो. प्रकाशक मिळाला नाही तरी आपले काम थांबता कामा नये या मतांचा मी आहे. सध्या तीन ते सहा वर्षे वयोगटासाठी लिहित असल्याचे त्यांनी सांगितले.
..................
बालसाहित्याला नेहमीच दुय्यम स्थान देण्यात आले आहे. खरेतर मुलांचे भावविश्व उलगडत मुलांना समजेल उमजेलअशा भाषेत लेखन करणे खूप अवघड आहे. तरीही बालसाहित्याकडे उपेक्षित नजरेने पाहाण्याचा दृष्टीकोन बदललेला नाही, याचे वाईट वाटते- राजीव तांबे, प्रसिद्ध बालसाहित्यकार