नेहा सराफ
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सिरमसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेतल्या इमारतीमध्ये प्रतीक कामासाठी जाणार होता. खरे तर प्रत्यक्ष कामाचा दिवस शुक्रवार (दि. २२) असणार होता. याच कामाची जुळवाजुळव करण्यासाठी गुरुवारी (दि. २१) तो सिरममध्ये गेला. जाताना आईला तो म्हणाला, ‘येतो गं...’ पण तो परतू शकला नाही. सिरमधल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. शुक्रवारी पहाटेच्याही आधी अडीच-तीनच्या सुमारास त्याचा होरपळलेला देहच कुटुंबीयांसमोर आला आणि त्याची आई-वडील, धाकटा भाऊ यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
प्रतीक पाष्टे. वय अवघे २१ वर्षे. राहणार, प्रभात रस्ता, एरंडवणे. घरची परिस्थिती सामान्य. आजारी वडील, चहाची गाडी चालवून संसाराचा गाडा ओढणारी आई आणि शिकणारा धाकटा भाऊ या सर्वांचा आधार होता तरुण, हसरा प्रतीक. त्याच्यामुळेच घरात चैतन्य होते. हे चैतन्यच आता कायमचे हरवल्याने प्रतीकचे जेमतेम एका खोलीचे घर आज दु:खाने भरून गेले आहे. वडिलांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे आणि आईच्या डोळ्यातल्या अश्रूंना बांध नाही.
घरची परिस्थितीची जाणीव ठेवत प्रतीकने इंजिनीअरिंगचा डिप्लोमा केला. स्वत: कमवत पुढे डिग्रीला प्रवेश घेण्याची त्याची जिद्द होती. त्यासाठीच तो कामावर जात होता. आगीची दुर्घटना घडली, त्या दिवशीही सकाळी तो म्हणाला, “आई मी कंपनीत जाऊन लवकर येतो.” परत आला तो त्याचा मृतदेह.
अवघ्या एका खोलीचं प्रतीकचं घर नातेवाइकांनी भरून गेलंय. प्रतीककडे असणााऱ्या वस्तुंवरून त्याच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात आली, हे सांगताना प्रतीकचे मामा गणेश घाणेकर यांचा स्वर कातर झाला होता. ते म्हणाले की, “प्रतीकला नेमकं कुठे दाखल केलंय, काय झालंय समजत नव्हतं. अखेर बातम्या बघून प्रतीक नाही हे समजलं.” प्रतीकच्या मित्रांनाही धक्का बसला आहे. रोज भेटणारा मित्र असा अचानक कायमचा निघून गेला, यावर त्यांना विश्वास ठेवणेही कठीण जाते आहे.
चौकट
२५ लाखांत प्रतीक परतेल का?
प्रतीकचा मृतदेह मिळविण्यासाठी पाष्टे कुटुंबीयांना अनेक तास वाट पाहावी लागली. “२५ लाखांत देऊन गेलेला माणूस परत येईल का,” असा प्रश्न त्याच्या विजय भोसले या मित्राने विचारला. तो म्हणाला की, अतिशय जवळचा मित्र आम्ही गमावला. घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवत, नोकरी करून शिकणारा प्रतीक मनाने खूप चांगला होता. आमचे एकत्र फोटो पाहिल्यावर तो नाही, हे मानण्यास मन तयार होत नाही.
(नोट- सॉरी, चुकून मी बातमी ओपन केली आणि सवयीनुसार वाचली आहे.)