लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “छत्रपती शिवरायांकडून आपण अनेक गोष्टी शिकलो. शिवरायांकडून शिकता येतील अशा अनेक घटना, प्रसंग आजही मोडी लिपीच्या उदरात दडलेले आहेत. ते उलगडायचे असतील, तर मोडी लिपीचा अभ्यास करायला हवा. शिवरायांचे प्रेम लाभलेल्या मोडी लिपीचे जतन व्हावे,” असे मत ‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’चे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त खराडी-चंदननगर येथे ४० फुटी मोडी लिपीतील रांगोळी श्रुती पाटील यांनी साकारली. या वेळी शाहीर गंगाधर रासगे, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती युवा धावपटू अवंतिका नराळे, महाराष्ट्रची लावण्यवती फेम नृत्यांगना पूजा शेडे, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता युवा खेळाडू सिद्धेश चौधरी आणि मोडी लिपीची अभ्यासक श्रुती पाटील यांचा सत्कार करण्यात आला. माजी आमदार बापूसाहेब पठारे, संजीला पठारे, महेंद्र पठारे आदी या वेळी उपस्थित होते.