तळेघर (पुणे) : श्रीक्षेत्र भीमाशंकर ते किल्ले शिवनेरी अशा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धारातीर्थ गडकोट मोहिमेला संभाजी भिडे गुरुजी यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली आहे.
या मोहिमेसाठी शनिवार, दि. २८ जानेवारी रोजी सकाळपासूनच शिवप्रतिष्ठानचे धारकरी भीमाशंकरकडे येण्यास सुरुवात झाली. अंदाजे ३५ ते ४० हजार धारकरी भीमाशंकरमध्ये दाखल झाले. भीमाशंकरमध्ये रविवारी पहाटे सहा वाजता आरती करून सांगली, सातारा, कोल्हापूर व राज्याच्या काेनाकोपऱ्यातून आलेल्या धारकऱ्यांनी शिवनेरीच्या दिशेने जंगलातून पायी वाटचाल करण्यास सुरुवात केली.
भीमाशंकरवरून कोंढवळ मार्गे भट्टी या जंगलामधून वीस ते पंचवीस कि.मी. असणाऱ्या आहुपे येथे त्यांचा पहिला मुक्काम आहे. दुसरा मुक्काम वरसुबाई सुकाळ वेढे येथे असून, तिसरा मुक्काम किल्ले शिवनेरीवर आहे. गडकोट या मोहिमेचा उद्देश गडकोटाचे संवर्धन, शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा असा आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी भीमाशंकरकडे येत असताना त्यांचे आदिवासी भागामध्ये ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.