शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडेंची छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळाला भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 03:16 AM2021-01-10T03:16:05+5:302021-01-10T15:47:32+5:30
कोरेगाव भिमा (ता. शिरूर)येथे झालेल्या दंगलीनंतर राज्यभर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांचे नाव प्रत्येक गोष्टीत येत होते.
कोरेगाव भीमा : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी श्री क्षेत्र वढु बुद्रुक (ता.शिरूर) येथील छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळी शनिवारी (दि. ९) भेट देऊन दर्शन घेतले. त्यांनी वाजेवाडी व वढु बुद्रुक (ता.शिरूर) येथील दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला भेट दिली.
शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ते वढु बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळी काही मोजक्या कार्यकर्त्यांसमवेत पोहचले. शिक्रापूर पोलिसांना माहिती समजताच त्यांनी छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ गाठले. या ठिकाणी भिडे गुरुजींना तेथे थांबण्यास मज्जाव केला. यानंतर भिडे गुरुजी यांनी वढु बुद्रुक येथील शिवाजी भोसकर यांच्या कुटुंबाला भेट दिली आणि वाजेवाडी (ता.शिरूर) येथील काही दिवसांपूर्वी एका अपघातात मृत्यू पावलेले अमित तिखे यांच्या कुटुंबीयांना भेटले व मार्गस्थ झाले.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनीही वरील माहितीला दुजोरा दिला. शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतली प्रत्येक गोपनीय माहिती संकलित करुन त्यावर कार्यवाही केली जात असल्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी सांगितले.