साहित्याशी एकरूप तेच खरे संगीत - सुरेश तळवलकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 01:33 AM2018-11-14T01:33:41+5:302018-11-14T01:33:58+5:30

सुरेश तळवलकर : ‘चकव्यातून फिरतो मौनी’ पुस्तकाचे प्रकाशन

The same true music with the literature - Suresh Talwalkar | साहित्याशी एकरूप तेच खरे संगीत - सुरेश तळवलकर

साहित्याशी एकरूप तेच खरे संगीत - सुरेश तळवलकर

googlenewsNext

पुणे : ‘एका कलाकाराला वेगवेगळे स्वभाव अनुभवावे लागतात, तरच सुरावट सुचते. साहित्याशी एकरूप होऊन जे संगीत सुचते तेच खरे संगीत होय,’ असे मत ज्येष्ठ तबलावादक सुरेश तळवलकर यांनी व्यक्त केले. येथील अक्षरमानव प्रकाशनातर्फे प्रा. डॉ. श्रीकृष्ण राऊत यांनी संपादित केलेल्या ‘चकव्यातून फिरतो मौनी’ या सन्मान ग्रंथाचे, कवी समीर चव्हाण यांच्या काळाची ‘सामंती निगरण’ या काव्यसंग्रहाचे आणि सुधाकर कदम यांच्या ‘फळे मधुर खावया..’ आणि ‘मीच आहे फक्त येथे पारसा’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तळवलकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पंडित अरविंदकुमार आझाद, उल्हास पवार, डॉ. विकास कशाळकर, पंडित पांडुरंग मुखडे, दिलीप पांढरपट्टे, सुरेशकुमार वैराळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

तळवलकर म्हणाले की, मुखडा हा संगीताचा प्राण असतो आणि तो परत परत घ्यावा लागतो, त्यातच त्या बंदिशीचे यश असते. मुखडा आणि सम हा भारतीय संगीताचा भावनिक उच्चांक आहे. संगीतातून नाद निर्माण होतो, छंद निर्माण होतो. हा छंद आणि नाद संगीतकाराला कळणे आवश्यक असते. गझल प्रकार हा लेहरा वादनाच्या जवळ जाणारा आहे. ज्या तालाच्या मात्रा मोजाव्या लागत नाही, त्या तालाला छंद म्हणतात. यावेळी समीर चव्हाण, सुधाकर कदम, प्रमोद खराडे, पांडुरंग मुखडे, पं. अरविंदकुमार आझाद यांनी मनोगत व्यक्त केले. मयूर महाजन आणि रेणू चव्हाण या गायक कलाकारांनी सादर केलेल्या या मैफलीला निषाद कदम (तबला), मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), कौस्तुभ पाटील (की- बोर्ड) या वादक कलाकारांनी सुरेल साथसंगत केली. शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे निवेदन केले.

‘सरगम तुझ्याचसाठी’ मराठी गीत-गझलांची मैफल

पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर गझलगंधर्व सुधाकर कदम यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘सरगम तुझ्याचसाठी’ ही मराठी गीत-गझलांची मैफल सादर करण्यात आली. समीर चव्हाण यांची ‘किती रुंजी तरी तिथल्या तिथे घालत रहावे...’, 'दिलीप पांढरपट्टे यांची 'काट्यांची मखमल', सुरेश भट यांची 'जगत मी आलो...', आणि 'ही न मंजूर वाटचाल..., सुधाकर कदम यांची 'तुम्हारे हुस्न में जो सादगी हैं...’ अशा भावपूर्ण गझलांनी उपस्थितांची मने जिंकली.
 

Web Title: The same true music with the literature - Suresh Talwalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.