जिल्ह्यात ३ जानेवारीला ‘महास्वच्छता’ अभियान
By admin | Published: December 31, 2014 11:12 PM2014-12-31T23:12:22+5:302014-12-31T23:12:22+5:30
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील तब्बल एक लाख महिलांसह सुमारे दोन लाख पुरुष स्वच्छ भारत अभियानात सहभाग घेऊन सर्व सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता करणार आहेत.
पुणे : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील तब्बल एक लाख महिलांसह सुमारे दोन लाख पुरुष स्वच्छ भारत अभियानात सहभाग घेऊन सर्व सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता करणार आहेत. केंद्र शासनाच्या स्वच्छता अभियानात देशात प्रथमच एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला सहभागी होणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी या महास्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन कंद व मुख्यकार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी केले.
या महास्वच्छता अभियानात गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणी, अंगणवाडी, शाळा, मंदिर, रस्ते, मैदाने, ओढे आणि नाले यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. याबाबत महिलामध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक तालुक्यात जाऊन अंगणवाडी सेविकांची बैठक घेण्यात येत असल्याचे मुंढे यांनी सांगितले. तसेच हे अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत आणि जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या महास्वच्छता अभियानासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरु केली आहे. यामध्ये सर्व लोकप्रतिनिधी,खासदार, आमदार, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह सर्व सरकारी अधिकारी, कर्मचारी, शाळा, शिक्षक, विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
१ लाख महिला स्वच्छता करण्यासाठी रस्त्यावर
पुणे जिल्ह्यात ४ हजार ५७० अंगणवाड्या असून, प्रत्येक अंगणवाडीच्या कार्यक्षेत्रात किमान १५० ते २०० कुटुंब समाविष्ट आहेत. त्यामुळे एका अंगणवाडी क्षेत्रात किमान २५ पालक महिला स्वच्छता अभियानात सहभाही झाल्यास जिल्ह्यात एकाच वेळी १ लाखांपेक्षा अधिक महिला स्वच्छता करण्यासाठी रस्त्यावर येणार आहेत.