रिंगरोड भूसंपादनास विरोधासाठी ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:09 AM2021-06-06T04:09:00+5:302021-06-06T04:09:00+5:30
पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नियोजित रिंगरोडच्या विरोधात खेड-शिवापूर परिसरातील ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सोमवारी खेड-शिवापूर ...
पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नियोजित रिंगरोडच्या विरोधात खेड-शिवापूर परिसरातील ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सोमवारी खेड-शिवापूर येथे हद्दकाम मोजणी नोटीसीस हरकत घेण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. विविध गावचे सरपंच, पोलीस पाटील यामध्ये सहभागी होणार आहेत.
खेड-शिवापूर परिसरातील सुमारे साडेसहाशे एकर जमीन रिंगरोडसाठी अधिग्रहित होण्याची शक्यता असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या विरोधाात अनेक गावांच्या ग्रामसभांमध्ये ठराव करण्यात आले आहेत. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार: १८ मे रोजी रस्ते विकास महामंडळाने हद्द कायम करण्यासाठी नोटीस दिली आहे. त्याविरोधात उपविभागीय अधिकाऱ्यांकडे हरकत नोंदविली आहे. तरीही हद्द कायम करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. या रस्त्यामुळे पर्यावरणीय नुकसान होणार आहे. तसेच ग्रामस्थांच्या उदरनिर्वाहाच्या साधनांवर गदा येणार आहे. त्यामुळे रिंगरोडसाठी भूसंपादनास विरोध असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.