पुणे : समान पाणी योजनेच्या कामात प्रशासनाने टाकलेल्या अटी, शर्ती, काही पदाधिका-यांनी चालवलेले गुप्ततेचे राजकारण याला विरोध करण्यात खासदार संजय काकडे यांचा महापालिकेतील नगरसेवकांचा गट सक्रिय झाला आहे. त्यातील सुमारे ४० नगरसेवकांनी गुरुवारी काकडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या योजनेतील त्रुटी त्यांच्या निदर्शनास आणल्या. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगू, असे आश्वासन काकडे यांनी संबंधित नगरसेवकांना दिले.योजनेची याआधीची निविदा रद्द करण्यातही काकडे यांचा मोठा वाटा होता. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून, साखळी करून तीनच ठेकेदार कंपन्यांनी योजनेचे काम वाटून घेतल्याची तक्रार केली होती. त्यानंतर लगेचच ती निविदा रद्द करण्यात आली. आता फेरनिविदेवरही अनेक आक्षेप घेण्यात येत आहेत. खुद्द काकडे यांनीच प्रशासनाला पत्र देत योजनेतील काही तरतुदींबाबत हरकत घेतली आहे. त्यामुळेच गुरुवारी काही नगरसेवकांनी काकडे यांची भेट घेऊन यात आणखी लक्ष घालावे, अशी विनंती केली.प्रशासनाने फेरनिविदेतही अशा अटी, शर्ती टाकल्या आहेत की, पूर्वी असलेल्याच तीन कंपन्या यात पात्र ठरतील. भागीदारी करून (जॉइंट व्हेन्चर) निविदा दाखल करण्याला मनाई करण्यात आली आहे. निविदेत नमूद केलेले मीटरसारखे साहित्य कमी दर्जाचे धरण्यात आले आहे. एका परदेशी कंपनीने दिलेल्या पत्रानुसार निविदेत गृहित धरण्यात आलेले मीटर कालबाह्य झालेले आहेत, अशी माहिती या नगरसेवकांनी खासदार काकडे यांना दिली. प्रशासनाने असे करूनही काही पदाधिकारी प्रशासनाला सहकार्य करत असल्याचे नगरसेवकांनी सांगितले.काकडे यांनी सर्व नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतले. आपण सगळेच भारतीय जनता पार्टीचे आहोत. पुणेकरांनी आपल्याला मत देऊन चांगले काम करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चुकीतून पक्षाला त्रास होत असले, बदनामी होत असेल तर अशा कामांना विरोध करण्यात काहीही गैर नाही. तुमची भूमिका तुम्ही स्थानिक पदाधिकाºयांना समजावून सांगा, मीही मुख्यमंत्र्यांना याबाबत सविस्तर माहिती देईन, असे आश्वासन काकडे यांनी सर्व नगरसेवकांना दिले.भाजपामध्ये कसलेही गट-तट नाही. मुख्यमंत्र्यांचा एकच गट आहे. नगरसेवकांचे म्हणणे त्यांनी मला सांगितले. कामकाज पारदर्शी असावे असा मी सुरुवातीपासूनच आग्रह धरला आहे. नगरसेवक तसे म्हणत असतील, तर प्रशासनाने त्यांचे ऐकले पाहिजे. त्यांचे शंकानिरसन केले पाहिजे. त्यांचे म्हणणे मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहे. ते यात व्यवस्थित मार्गदर्शन करतील. मला नगरसेवक भेटायला आले म्हणजे माझा गट झाला असे होत नाही. त्यांनी फक्त त्यांचे म्हणणे मांडले. - खासदार संजय काकडे
नगरसेवकांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार - संजय काकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 4:04 AM