Sanjay Raut : शरद पवारांवर आरोप करण्याची सध्या फॅशन, त्याच्याशिवाय बातम्याच होत नाही...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 02:45 PM2021-06-05T14:45:56+5:302021-06-05T14:57:41+5:30
काही दिवसांपूर्वीच शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे 'गॉडफादर'आहेत.त्यामुळे काही दोष त्यांच्याकडेही जातो असे चंद्रकांत पाटील मराठा आरक्षणावर भाष्य करताना म्हणाले होते.
पुणे: ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर आरोप करण्याची सध्या फॅशन झाली आहे. त्याशिवाय बातम्याच होत नाहीत, या शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना टोला लगावतानाच चंद्रकांत पाटलांवर देखील टीकास्त्र सोडले आहे.
शिवसेना नेते व खासदार संजय राऊत हे शनिवारी( दि. ५) पुणे दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, चंद्रकांत पाटील हे वसंतदादा पाटील नाहीत. पण कोणी किती वैयक्तिक बोलावं याचा विचार करायला हवा.शरद पवारांवर आरोप केल्याची सध्या फॅशन झाली आहे. त्याशिवाय बातम्या होत नाहीत. आगामी काळात होणारी निवडणुकांमध्ये आम्ही किंग किंवा किंगमेकर यापैकी काही तरी नक्की असणार आहोत.
सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिंकावं ही आमची भूमिका आहे. त्यासाठी जे जे करावं लागेल ते करणार आहोत. तसेच आगामी काळात होणारी निवडणुकांमध्ये आम्ही किंग किंवा किंगमेकर यापैकी एक काही तरी नक्की असणार आहोत असा आत्मविश्वास देखील राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच राज्यात अनलॅाक होतोय ही चांगली गोष्ट आहे. प्रत्येक पायरीवर निर्बंध कमी कसे करायचे याची आखणी केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून महाराष्ट्र हळूहळू बाहेर पडतोय ही चांगली गोष्ट आहे. महाविकास आघडी सरकार मध्ये सगळं काही व्यवस्थित सुरु आहे पण कोना कोणात थोडा उत्साह असतो अशा शब्दात राऊत यांनी विजय वड्डेटीवार यांच्या निर्बंध शिथिल करण्याच्या जाहीर केलेल्या निर्णयावर मिश्कील टिपण्णी केली.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील...
महाविकास आघाडीतील मतभेद, तसेच कोरोना परिस्थिती यांसारख्या मुद्द्यांचा संदर्भ घेत विरोधकांकडून सातत्याने शरद पवार यांच्यावर टीका केली जाते. यात भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील हे आघाडीवर असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे गॉडफादर आहेत. वैचारिक मार्गदर्शक आहे. स्वतःच्या पक्षासह आघाडीतील घटक पक्षांवर देखील त्यांचा कंट्रोल आहे.त्यामुळे निर्णयाच्या पातळीवर काही होत असेल तर नेते म्हणून दोष त्यांच्याकडेही जातो असं मत मराठा आरक्षणावर बोलताना म्हटले होते.