पुणे :अजित पवार हे महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री असतील या शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. राऊत आमचे हितचिंतक आहेत, मात्र मी पक्षप्रमुख आहे अशा शब्दात पवार यांनी हा राऊत यांच्या विधानाचे समर्थन करणे टाळले.
जवळपास ७० कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यातून लाचलुचपत विभागाने अजित पवार यांना क्लीनचिट दिली. त्यानंतर राऊत यांनी प्रतिक्रिया देताना ,' क्लीनचिटचा आनंद आहे, ते होणारे उपमुख्यमंत्री आहेत' असे विधान केले. त्यामुळे अजित पवार समर्थकांनी आनंदही व्यक्त केला होता. मात्र आता शरद पवार यांच्या विधानानंतर पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.
राऊत यांच्या विधानावर पवार म्हणाले की, 'मला वाटतं, आमच्या पक्षाचा प्रमुख आहे आणि याद्या माझ्याकडे आहेत. राऊत आमचे मित्र आहेत आणि आता हितचिंतकही आहेत असं सांगायलाही ते विसरले नाहीत, मात्र अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या निर्णयावर त्यांनी भाष्य करणे टाळले.
या पत्रकार परिषदेत पवार यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :
- एनआरसी, सीएए प्रस्तावाला आमचा विरोध, मतदानही विरोधात केले. यामुळे सामाजिक आणि धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता.
- सरकारकडून गंभीर प्रश्नांपासून मन वळवण्याची काळजी घेतली जात आहे.
- एका विशिष्ट समाजावर त्यांनी लक्ष केंद्रित केले.
- धार्मिक आणि सामाजिक ऐक्याला धक्का देण्याचे काम केले जात आहे. देशाची अर्थव्यवस्था संकटात असताना लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे.
- एल्गार परिषदेप्रकरणी पुणे पोलिसांचे वागणे आक्षेपार्ह्य, त्यांनी अधिकारांचा गैरवापर केला, सत्तेचा गैरवापर केला, मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणून अनेकांना आत टाकलं. पुणे पोलिसांच्या कारवाईची चौकशी करावी.