पुणे : वारी वो वारी ! देई कां गा मल्हारी ! त्रिपुरारी हरी! तुझे वारीचा मी भिकारी!!भागवत संप्रदायाची भगवी पताका फडकत, तुळशी वृंदावनाच्या डौलात, ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत मल्हारनगरीत माऊली खंडोबारायाच्या भेटीला जेजुरीत विसावलीे.
सासवडला दोन दिवसांच्या मुक्कामानंतर रविवारी सकाळी आठ वाजुन पंधरा मिनिटांनी पालखी जेजुरी गडाकडे निघाली. दरम्यान सोपानदेव महाराजांची पालखीने सकाळी अकरा वाजता पिंपळे मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान केले. यावेळी टाळ मृदुगांच्या गजराने अवघा परिसर नाहून निघाला होता. बोरावळेमळा येथे पालखी पहिल्या विसाव्याला थांबली. त्यानंतर पालखी मार्गस्थ होऊन दुपारी यमाई शिवरी येथे तर दुसऱ्या विसाव्यासाठी आणि नैवेद्यासाठी थांबली होती. साकुर्डे येथे तिसरा विसावा घेऊन साडे पाच वाजता खंडेरायाच्या जेजुरीत आगमन झाले. यावेळी भंडारा उधळून पालखीचे स्वागत करण्यात आले. पालखीचा मुक्काम लोणारी समाज संस्थेच्या मैदानावर असणार आहे.
सकाळी ढगाळ वातावरण होते. मात्र हवेत गारवा होता. त्यामुळे गरमी वाटत नव्हती. वारीत चालणारे वारकरी घामाघूम होत असले तरी, चेहऱ्यावर कुठेही थकवा जाणवत नव्हता. तालासुरात वाजणाऱ्या मृदुगांच्या संगीतावर वारकरी मोठ्या उत्साहाने भजन म्हणत नाचत होते. अधनमधून पडणाऱ्या पावसाच्या हलक्या सरी त्यांचा उत्साह वाढवत होत्या. हलगीचा ताल त्यांच्या उत्साहात भर घालत होता. दुपारी दोनच्या सुमारास पावसाने चांगलाच जोर धरला होता. रस्त्याच्या कडेला मोफत अन्नदान करणारे, पाणी वाटप करणारे स्टॉल उभारले होते. जेजुरी दिसताच वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित होत होता. अनेक वारकऱ्यांनी खंडेराच्या दर्शनासाठी गडावर गर्दी केली होती. जेजुरीत मुक्काम असल्याने राहुट्या उभारल्या होत्या. येथे उत्तम नियोजन दिसुन येत होते. काही ठिकणी कीर्तन, भारुडे, गवळण सुरू होती. जिजाऊ माता शाळेचे आरएसपीचे मुलं मुली वाहतूक नियमनासाठी मदत करत होते.
परिसर भंडाराने सुवर्णमय झाला मल्हारीस हळद अवडते, म्हणून येथे येणारा प्रत्येक भक्त मुक्त हाताने खोबरे भंडाऱ्याची उधळन करत असतो. म्हणून जेजुरीत पालखी येताच भंडारा उधळण्यात येतो. परिसर भंडाराने सुवर्णमय झाला होता. खंडोबा हे शोर्याची स्पुर्ती देणारी देवता म्हणून ओळखला जातो. सोमवारी (आज) माऊलींची पालखी सकाळी वाल्हे येथे मुक्कामासाठी निघणार आहे.