चहावाला कमावतो महिना १२ लाख !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 04:39 AM2018-03-05T04:39:24+5:302018-03-05T04:39:24+5:30
चहा पिण्यासाठी चक्क रांग लागलेली... या गरमागरम वाफाळलेल्या चहाची लज्जतच निराळी... सोबत चहा प्याल्याने होणारे फायदे सांगणाºया पुणेरी पाट्या आणि या ‘अमृत’ असणाºया चहाच्या दुकानाची उलाढाल ऐकाल तर अचंबित व्हाल.
पुणे : चहा पिण्यासाठी चक्क रांग लागलेली... या गरमागरम वाफाळलेल्या चहाची लज्जतच निराळी... सोबत चहा प्याल्याने होणारे फायदे सांगणाºया पुणेरी पाट्या आणि या ‘अमृत’ असणाºया चहाच्या दुकानाची उलाढाल ऐकाल तर अचंबित व्हाल. केवळ चहाचे दुकान असणाºया या ‘गोड’ व्यवसायाची महिनाभराची उलाढाल आहे बारा लाख रुपये. होय, ही किमया पुण्यातील येवले टी हाऊसने केली आहे. कारण त्यांच्या चहाची लज्जत ‘लाख’मोलाची असल्याने पुणेकरही त्यांच्याकडे येऊन रांग लावून चहाचा फुर्रका घेत आहेत.
दगडूशेठ हलवाई गणपतीच्या बाजूला फरासखाना पोलीस स्टेशनच्या समोरील बाजूस येवले अमृतमुल्य आहे. शोरूमसारखी या चहाच्या दुकानाची रचना केली आहे. या दुकानाच्या आतमध्ये गेल्यावर डाव्या बाजूला एक काऊंटर आहे. आतील बाजूस ‘एकमध्ये दोन चहा करून मिळणार नाही’, ‘चहा प्याल्यावर पित्त होत नाही,’ या सूचनांच्या पुणेरी पाट्यांमुळे चहा पिणाºयांची चांगलीच करमणूक होते.
त्यांचा हा पारंपरिक व्यवसाय
या अमृततुल्यचे मालक नीलेश येवले आहेत. त्यांचा हा व्यवसाय पारंपरिक आहे. अनेक वर्षांपूर्वी त्यांनी हा व्यवसाय बंद करून दुसरा सुरू केला होता. परंतु, त्यामध्ये त्यांना यश आले नाही. त्यामुळे त्यांनी या ‘गोड’ व्यवसायाला पुन्हा सुरुवात केली. त्यांच्या या व्यवसायातून आता लाखोंची उलाढाल होत आहे. कात्रज आणि अप्पा बळवंत चौक येथे त्यांचे अमृततुल्य दुकान आहे. दोन्ही दुकानांची मिळून महिना १२ लाख रुपयांची उलाढाल होत आहे. त्यांच्या दोन्ही दुकानांत मिळून २४ कामगार आहेत.