घातक हत्यारांसह सराईत गजाआड
By admin | Published: January 11, 2017 02:20 PM2017-01-11T14:20:19+5:302017-01-11T14:20:19+5:30
एका इस्टेट एजंटवर हल्ला करण्यासाठी शस्त्रांची जमवाजमव करुन दहशत माजवण्याच्या तयारीत असलेल्या दोन सराईतांना सिंहगड रोड पोलिसांनी गजाआड केले आहे.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 11 : एका इस्टेट एजंटवर हल्ला करण्यासाठी शस्त्रांची जमवाजमव करुन दहशत माजवण्याच्या तयारीत असलेल्या दोन सराईतांना सिंहगड रोड पोलिसांनी गजाआड केले आहे. विशेष म्हणजे अटक आरोपींनी यापुर्वीही या इस्टेट एजंटवर गोळीबार केलेला होता. आरोपींकडून २ पिस्तूल, चार जिवंत काडतुसे, तीन कोयते, एक कट्यार, एक सुरा जप्त करण्यात आला आहे.
दत्तात्रय किसन पोकळे (वय ३५, रा. कुंभार चावडीजवळ, धायरीगाव), अक्षय आनंदा चौधरी (वय २१, रा. नांदोशी, ता. हवेली) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोकळे आणि चौधरी यांच्याकडे मोठा शस्त्रसाठा असून हे दोघेही भैरवनाथ मंदिराजवळ येणार असल्याची माहिती संतोष सावंत यांना मिळाली होती. त्यानुसार, उपनिरीक्षक गिरीष सोनवणे यांच्या पथकाने सापळा लावत दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पिस्तूलांसह, सुरे, चाकू जप्त करण्यात आले आहेत. दोघांवरही बेकायदा शस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा शस्त्र साठा कोठून आणण्यात आला त्याचा तपास सुरु आहे.
अक्षय चौधरी याने त्याचे साथीदार रियाझ जमादार (वय २०, रा. जनता वसाहत), महावीर घारबुडवे (वय २१, रा. महात्मा फुले वसाहत), अक्षय निवंगुणे (वय २२, रा. आंबेगाव) यांच्यासोबत इस्टेट एजंट असलेल्या आप्पा आखाडे आणि त्याचा भाऊ शंकर आखाडे या दोघांवर ६ आॅक्टोबर २०१२ रोजी गोळीबार केला होता. मुंबई - बेंगलुरु महामार्गावरील पाटील बागेतील आखाडेंच्या कार्यालयामध्ये घुसून आरोपींनी केलेल्या गोळीबारात दोघांच्या पोटात आणि पायामध्ये गोळ्या लागल्या होत्या. त्यानंतर नांदोशी गावचे माजी सरपंच अर्जून घुले यांचा वडगाव धायरी पुलाखाली धारदार हत्यारांनी वार करुन तसेच गोळ्या झाडून ४ जुलै २०१३ रोजी खून करण्यात आला होता. घुले हा पोकळेचा सख्खा मामा आहे. घुलेंचा खून आप्पा आखाडेने केल्याचा पोकळे याला संशय होता. तसेच यापुर्वी घुलेंवर २०११ साली झालेल्या प्राणघातक हल्ल्यामध्येही आखाडेचाच हात असावा असाही संशय या दोघांना होता.
आखाडेवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तो आपल्यावर हल्ला करणार असल्याची माहिती या दोघांना समजली होती. तसेच त्यांच्यामध्ये काही दिवसांपासून कुरबुरीही सुरु झाल्या होत्या. त्यामुळे आरोपींनी मोठ्या प्रमाणावर शस्त्र आणली होती. संधी मिळाल्यास आखाडेवर हल्ला करण्याची या दोघांनी तयारी केल्याचे तपासात समोर आले आहे. ही कारवाई परिमंडल दोनचे उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास उपनिरीक्षक गिरीष सोनवणे करीत आहेत.