सावरकर यांच्यावरील हत्येचा ठपका पुसला जावा
By admin | Published: September 7, 2015 04:32 AM2015-09-07T04:32:34+5:302015-09-07T04:32:34+5:30
महात्मा गांधी यांच्या हत्येच्या आरोपातून न्यायालयाने सावरकरांची निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र त्यानंतर कपूर कमिशनच्या अहवालावरून सावरकरांवर ठपका ठेवण्यात आला
पार्ट ब्लेअर : महात्मा गांधी यांच्या हत्येच्या आरोपातून न्यायालयाने सावरकरांची निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र त्यानंतर कपूर कमिशनच्या अहवालावरून सावरकरांवर ठपका ठेवण्यात आला. सावरकरांची बदनामी थांबवायची असेल तर सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून अहवालातील परिच्छेद काढून टाकावा, अशी मागणी चौथ्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. शेषराव मोरे यांनी केली.
चौथ्या विश्व साहित्य संमेलनाचा रविवारी समारोप झाला. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘सावरकरांच्या मृत्यूनंतर कपूर कमिशनने दिलेल्या अहवालात सावरकर यांच्यावर ठपका ठेवला. त्या अहवालानुसार सावरकर यांच्याविरोधात सातत्याने लेखन केले जात आहे. न्यायालयाने सावरकर यांना निर्दोष ठरविले आहे. तरीही त्यांना कुणी दोष देत असेल तर थेट सावरकरप्रेमींनी पोलिसांत तक्रार दिली पाहिजे. कारण कपूर कमिशनच्या दोन खंडाच्या अहवालात असे कुठेही म्हटलेले नाही, की सावरकरांमुळे गांधीजी यांची हत्या झाली. केंद्रात तसेच राज्यात किमान सावरकरद्वेषी सरकार नाही, त्यामुळे या सरकारांनी पुढाकार घेऊन अहवालातील परिच्छेद काढून टाकावा.’’
संमेलनाच्या अखेरच्या दिवशी सावरकर यांच्यावर आधारित कार्यक्रम झाले. ‘समाजसुधारणा आणि विज्ञाननिष्ठा’ हा परिसंवाद रंगला. विज्ञाननिष्ठ सावरकर म्हणजे काय, या वेळी सांगण्यात आले. ‘मी सावरकर बोलतोय’ हा विशेष एकपात्री कार्यक्रम झाला. अभिनेते योगेश सोमण यांनी याचे सादरीकरण केले. मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक संस्थेने आयोजित केलेला ‘शतजन्म शोधताना’ या कार्यक्रमाद्वारे महाकवी सावरकर यांचे अनोखे दर्शन झाले.
संमेलनासाठी आलेल्या रसिकांनी कार्यक्रमापेक्षा पर्यटनाला अधिक महत्त्व दिल्याने रविवारी अखेरच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह रिकामे-रिकामेच होते. मोजक्या रसिकांची उपस्थिती होती.
संमेलनासाठी तीनशे-चारशे नागरिक आले. मात्र अखेरच्या दिवशी यातील बहुतेकांनी संमेलनाकडे पाठ फिरविली. सकाळपासूनच पर्यटनाला सुरुवात झाली.
महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारीही अभावानेच दिसून येत होते. रसिक नसल्याने वक्त्यांनी आपल्या भाषणातून नाराजी व्यक्त केली.
संमेलनाच्या समारोप समारंभाला घुमान साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे, खासदार, स्वागताध्यक्ष राहुल शेवाळे, अंदमानच्या कला आणि संस्कृती विभागाचे प्रमुख आर. देविदास, अंदमानचे खासदार विष्णूदास रे यांच्या पत्नी रूपा रे, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, सुनील महाजन, पोर्ट ब्लेअर महाराष्ट्र मंडळाचे अरविंद पाटील उपस्थित होते.
सावरकर यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांना सेल्यूलर जेलच्या भिंतीही थांबवू शकल्या नाहीत, असे मत आर. देविदास यांनी व्यक्त केले. अंदमान निकोबार बेटावर जपल्या जाणाऱ्या मराठी संस्कृतीचे त्यांनी कौतुक केले.(प्रतिनिधी)