अवघ्या अठराव्या वर्षी सावित्रीबाई फुले झाल्या पहिल्या शिक्षिका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 10:00 AM2020-01-03T10:00:00+5:302020-01-03T10:00:02+5:30
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठीची पहिली शाळा पुण्यात सुरु केली.
पुणे : क्रांतीज्याेती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 ला झाला. आशिया खंडात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा पुण्यात सुरु केली. बुधवार पेठेतील भिडे वाड्यात 1 जानेवारी 1848 ला ही शाळा सुरु करण्यात आली. या शाळेच्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले हाेत्या. जेव्हा ही शाळा सुरु करण्यात आली तेव्हा सावित्रीबाई यांचे वय अवघे 18 वर्षे हाेते. सनातनांच्या विराेधाला न जुमानता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी ही शाळा सुरु केली.
इ,स 1840 मध्ये सावित्रीबाई फुले यांचा महात्मा फुले यांच्याशी विवाह झाला. महात्मा फुले यांनी स्वतः सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले. महात्मा फुले यांनी अहमदनगर येथे मिशनऱ्यांची शाळा पाहिली हाेती. तशी शाळा पुण्यात सुरु करावी असा त्यांचा विचार हाेता. त्यांनी सावित्रीबाई फुलेंना 1 जानेवारी 1848 ला भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरु करुन दिली. सावित्रीबाईंनी साऱ्या कर्मठ समाच्या विराेधाला न जुमानता विवाहनंतर शिक्षण घेतले. शाळेच्या पहिल्याच दिवशी सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर कर्मठांनी शेणाचे गाेळे फेकले. तरीही न डगमगता सावित्रीबाईंनी मुलींना शिक्षण दिले. सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातील केवळ सहा मुली हाेत्या. 1848 वर्षाच्या शेवटपर्यंत ही संख्या 40 ते 45 मुलींपर्यंत जाऊन पाेहचली. अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला.
इ.स. 1896-97 सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून १० मार्च, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.