चाकण : खराबवाडी (ता. खेड) येथील महादेवाच्या डोंगरावरील मंदिरात पुरातन महादेवाचे शिवलिंग (पिंडी) फोडून विटंबना केली आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुप्तधनाच्या लालसेपोटी हा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, हा प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी (दि. ४) ते रविवारी (दि. ६) सकाळी साडेआठ वाजण्यापूर्वी घडली असून, याप्रकरणी शिवउद्योग सहकार सेनेचे तालुका अध्यक्ष शंकर नारायण खराबी (वय ३८, रा. खराबवाडी,चाकण) यांनी खबर दिली आहे. काही जण अभिषेक करण्यासाठी डोंगरावरील मंदिरात गेले असता हा प्रकार उघडकीस आला. सरपंच कड यांनी त्वरित याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या ठिकाणी शिवलिंग असलेली पिंडी दोन भागात तुटलेली व पिंडीखाली खड्ड्यात २ लिंबे, नारळ, फळे, कापूर, बेल, फुले, कुंकू, अगरबत्ती पाकीट व इतर पूजेचे साहित्य गाडलेल्या स्थितीत आढळून आले. तसेच मंदिरालगत एक रॉकेलची बाटली व चादर आढळून आली. पोलीस उपनिरीक्षक सुहास ठोंबरे पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)
खराबवाडीत शिवलिंग फोडले
By admin | Published: September 07, 2015 4:21 AM