सोमवारी शाळांची घंटा वाजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:12 AM2021-01-03T04:12:49+5:302021-01-03T04:12:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षांकरिता आवश्यक अभ्यासक्रम प्रत्यक्ष शिकविणे क्रमप्राप्त असल्याने व मार्चपासून सुरू होणाऱ्या दहावी-बारावीच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षांकरिता आवश्यक अभ्यासक्रम प्रत्यक्ष शिकविणे क्रमप्राप्त असल्याने व मार्चपासून सुरू होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा या पार्श्वभूमीवर सोमवारपासून (दि. ४) शहरातील सर्व माध्यमिकच्या शाळा म्हणजेच इयत्ता बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत़
माध्यमिकच्या शाळांची घंटा वाजणार असली, तरी पालकांनी संमती दिलेल्या पाल्यांनाच व एका वर्गात एका बाकावर एकच विद्यार्थी, असे नियोजन करूनच हे वर्ग भरणार आहेत़ पुणे महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या सर्व शाळांची त्या-त्या क्षेत्रीय अधिकारीवर्गाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करताना करावयाच्या उपाययोजनांची पाहणी केली आहे़ माध्यमिकचे वर्ग सुरू करण्यासाठी महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये तयारी पूर्ण झाल्याने सोमवारपासून माध्यमिकचे वर्ग सुरू करणार आहेत़
कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाऊनपूर्वीपासूनच म्हणजे १६ मार्चपासून बंद असलेल्या शाळा आता टप्प्या-टप्प्याने सुरू होत आहे़ याची सुरुवात माध्यमिक शाळांपासून सुरू झाली आहे. कोरोनावरील लस सर्वांना येत्या काही दिवसांमध्ये उपलब्ध होणार असल्याची शक्यता लक्षात घेता इतर इयत्तेंचे वर्ग सुरू होण्याची शक्यता आहे़ दरम्यान, प्राथमिक शाळा या शैक्षणिक वर्षात सुरू होतील की नाही, याबाबत मात्र अद्यापही साशंकता आहे़