पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच बांबू क्राफ्ट संशाेधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात येणार असल्याची घाेषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली अाहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी विद्यापीठाला 35 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात अाला अाहे. त्यामुळे या केंद्राच्या माध्यमातून बांबू लागवडीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळणार असून स्थानिक बांबू कलाकारांच्या काैशल्याला अधिक वाव मिळमार अाहे. त्याचबराेबर राेजगारनिर्मितीसही चालना मिळणार अाहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबराेबरच राहुरी येथील कृषी विद्यापीठ अाणि अमरावतीमधील संत गाडगेबाबा विद्यापीठामध्येही अशा बांबू क्राफ्ट संशाेधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास सरकारने मंजुरी दिली अाहे. महाराष्ट्र वन विभाग या तीन विद्यापीठांमध्ये या केंद्रांची स्थापना करणार अाहे. राष्ट्रीय बांबू मिशन या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांशी प्रकल्पांतर्गत बांबूलागवडीसंदर्भातील संशाेधन व राेजगारनिर्मितीवर विशेषत्वे लक्ष्य केंद्रित करण्यात अाले अाहे. या पार्श्वभूमीवर ही घाेषणा अत्यंत महत्त्वपूर्ण अाहे. वन विभागाच्या या माेहिमेद्वारे संशाेधनामधून अत्युच्च वाणाचे बांबूचे पीक विकसित करण्याचे उद्दिष्ट अाखण्यात अाले अाहे. याचबराेबर, केंद्राकडून वैज्ञानिक पद्धतीने बांबूची लागवड करण्यासाठी स्थानिकांना मार्गदर्शनही केले जाणार अाहे. या प्रशिक्षणामधून स्वयंराेजगाराची निर्मिती व्हावी अाणि स्थानिक बांबू कलाकारांचे काैशल्य संवर्धन व्हावे, असे ध्येय निश्चित करण्यात अाले अाहे. विद्यापीठामधील विविध विभाग, इतर इमारतींसह महाविद्यालयांमध्ये या प्रशिक्षण केंद्रामध्ये तयार करण्यात अालेले फर्निचर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येईल. याचबराेबर, बांबूपासून तयार करण्यात अालेल्या मानचिन्हांचाही विद्यपीठास वापर करता येईल. हे केंद्र लवकरच अार्थिकदृष्ट्या पूर्णतः सक्षम व्हावे, असा अामचा प्रयत्न असे, असे विद्यापीठामधील काैशल्य विकास विभागाच्या प्रभारी संचालक डाॅ. पूजा माेरे यांनी सांगितले.
बांबू लागवडीचे मिळणार शास्त्रशुद्ध प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 11:42 AM