वारजे : बंगळुरू-मुंबई बाह्यवळण महामार्गावर वारज्यातील मुठा नदी पुलाजवळ एका कठड्याला आॅइलचा टँकर घासून उलटला. यात चालकासह कोणीही जखमी झाले नसले, तरी रस्त्यावर आडव्या पडलेल्या टँकरमुळे व तुटलेल्या कठड्यामुळे कात्रजकडून वारज्याला येणारी मार्गिकाच बंद झाल्याने तासभार वाहतूककोंडी झाली.याबाबत वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टँकर (एमएच १२ एचडी २५६४) एका खासगी कंपनीसाठी डिझेल आणायचे काम करीत होता. सोमवारी नेहमीप्रमाणे येवलेवाडीहून वारजे येथे डिझेल आणण्यासाठी वारजेकडे येत असताना संध्याकाळी चारच्या सुमारास मुठा नदी ओलांडताच पुढे जाणाऱ्या मोटारीने अचानक डावीकडे वळण घेतले. त्यास चुकवण्याच्या प्रयत्नात चालक आजिम रहीम खान (वय ३५ रा. गोगवलेवाडी, कात्रज) याने त्याचे वाहन उजवीकडे घेतले. जास्त वेग असल्याने नदीच्या पुढे असलेल्या ओढ्यावरील पुलाच्या उजव्या बाजूच्या कठड्यास हा टँकर घासला व पलटी झाला. यामुळे निम्म्यापेक्षा जास्त मार्गिका बंद झाल्याने दुचाकी व छोट्या मोटारीच पुढे निघत होत्या. त्यामुळे थोड्या वेळातच वडगाव पुलाच्यापलीकडेपर्यंत वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या. वारजे वाहतूक विभाग व वारजे पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी यांनी अपघातस्थळी भेट देऊन क्रेनच्या साहाय्याने टँकर बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बघ्यांच्या गर्दीमुळे दोन्ही मार्गिकांमध्ये कोंडी वाढतच जात होती. वरिष्ठ निरीक्षक अनुजा देशमाने यांच्या सूचनेनुसार शेवटी टँकर महामार्गाच्या कडेला घेण्यात आला व पाचनंतर हळूहळू महामार्गाची वाहतूक पूर्वपदावर आली. (वार्ताहर)
कठड्याला घासून टँकर उलटला
By admin | Published: November 15, 2016 3:46 AM