पुणे : भांडणे सोडविल्याच्या रागातून तरुणाला कोयत्याने मारहाण करुन जबर जखमी करण्याचा प्रकार विमाननगरमधील यमुनानगर येथे घडला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
तुषार राजु बनसोडे (वय १८, रा. यमुनानगर, विमाननगर), महेश बलभिम सरोदे (वय २१, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), आकाश सुग्रीव घोडेस्वार (वय ३१, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), करण भारत सोनवणे (वय २३, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी विशाल कापसे (वय २१, रा. यमुनानगर, विमाननगर) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी यांचे करण तुजारे याच्याबरोबर भांडणे झाले होते. ही भांडणे विशाल कापसे यांनी सोडविली होती. त्याचा राग आरोपींना होता. रविवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास विशाल हा यमुनानगरमधील मामाच्या घराजवळ असताना आरोपी तेथे आले व त्यांनी विशालकडे पाहून हा पण होता का असे बोलून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तुषार याने कोयत्याने त्याच्या डोक्यावर वार केला. तो त्याने अडविला असता विशालच्या हातावर, मनगटावर वार केला. त्याच्या साथीदारांनी तलवारीने त्याच्या डोक्यात मारुन जबर जखमी केले. हा प्रकार सुरु असताना अनेक लोक तेथे जमले. या लोकांना तलवार व कोयता हवेत फिरवून कोणी पुढे आला तर एकेकाला ठार करेन अशी धमकी देऊन दहशत निर्माण केली. विमानतळ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. महेश सरोदे, आकाश घोडेस्वार आणि करण सोनवणे हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. पोलीस उपनिरीक्षक पिंगळे अधिक तपास करीत आहेत.