खाकीतील 'देवदूता'चा शोध घेत 'त्या' पोहोचल्या न्यूझीलंडहून थेट पुण्यातील पोलीस ठाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 12:03 AM2019-01-03T00:03:06+5:302019-01-03T00:03:48+5:30
एकीकडे नात्यांची वीण उसवत चाललेली असताना काही अदृश्य नाती मात्र वर्षाेनुवर्षे मनामध्ये तजेली असतात. नात्यांची कृतज्ञता कायम जपत असतात.
पुणे : एकीकडे नात्यांची वीण उसवत चाललेली असताना काही अदृश्य नाती मात्र वर्षाेनुवर्षे मनामध्ये तजेली असतात. नात्यांची कृतज्ञता कायम जपत असतात. अशीच एका देवदूतप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दोन सख्ख्या बहिणी थेट न्यूझीलंडवरून पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात पोचल्या. खाकीतील देवदूताने दिलेल्या आधारामुळे या दोघींच्या आयुष्यात लख्ख प्रकाश पडला होता.
सिमा झिनत (वय २४) आणि रिमा साजिया (वय २३) अशी त्यांची नावे आहेत. रिमा साजिया या न्यूझीलंडमध्ये इंजिनिअर आहेत तर, सिमा झीनत हिने भरत नाट्यमचे शिक्षण घेतले असून न्यूझीलंडमध्ये त्या शिक्षिका आहेत. ही गोष्ट थेट मागे जाते ते १९९८ मध्ये. डेक्कन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार एस. के. कांबळे यांना संजिवनी हॉस्पिटलच्या मागे सिमा (वय ३) आणि रीमा (वय २) या दोघी सापडल्या होत्या. त्यांच्या नातेवाईकांचा शोध लागत नसल्याने त्यांना २५ एप्रिल १९९८ रोजी बाल कल्याण मंडळाच्या आदेशानुसार सोफीश, श्रीवत्स संस्थेकडे सोपविण्यात आले. या मुलींच्या नातेवाईकांचा शोध न लागल्याने तसेच त्यांना दत्तक घेण्यासाठी भारतीय नागरिक पुढे न आल्याने या दोन्ही मुलींना न्यूझीलंडमधील दाम्पत्याने १९९९ साली दत्तक घेतले.
दत्तक गेल्यानंतर त्या दाम्पत्याने दोघींचा चांगला सांभाळ केला. त्यांचे शिक्षणही पूर्ण झाले. तरी आपले मुळे शोधण्याची त्यांच्या मनातील रुखरुख काही कमी झाली नाही. शेवटी त्या आपल्या न्यूझीलंडच्या आई वडिलांना घेऊन पुण्यात आल्या. त्यांनी ससून रुग्णालयातील श्रीवत्स संस्थेला भेट दिली. तेथील प्रशासकीय अधिकारी शर्मिला सय्यद यांनी त्यांची माहिती घेतली. तेव्हा त्यांना डेक्कन पोलिसांनी आणले असल्याचे समजले. त्यानंतर त्या बुधवारी डेक्कन पोलीस ठाण्यात आल्या.
त्यांनी सहायक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांची भेट घेऊन त्यांना हकीकत सांगितली. तेव्हा तत्कालीन पोलीस हवालदार एस. के. कांबळे यांना त्या सापडल्याच्या नोंदी आढळून आल्या. पण, आता २० वर्षानंतर कांबळे यांची माहिती त्यांना मिळू शकली नाही. त्यांनी न पाहिलेल्या कांबळे यांचे आभार मानले. पोलिसांमुळे आम्हास आई वडील मिळाले. त्यामुळे आमचे जीवन सुंदर झाले, असे त्यांनी भावविवश होत सांगितले. आता डेक्कन पोलीस ठाणेमध्ये आपले घर आहे, असे समजून त्या काही वेळ पोलीस ठाण्यात थांबले. त्यांच्या आईवडिलांनीही पोलिसांचे आभार मानले. डेक्कन पोलिसांनी त्यांचे आदरातिथ्य केले. हवालदार कांबळे यांचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. इतक्या लांबून आपल्या आईवडिलांना शोधत आलेल्या या मुलींना पाहून पोलिसही भारावून गेले.