डीएसकेंच्या शोधासाठी पोलीस पथके परराज्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 03:22 AM2017-12-22T03:22:51+5:302017-12-22T03:23:20+5:30
मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी हे पत्नीसह गायब झाले आहेत़ त्यांच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी परराज्यात पथके रवाना केली आहेत़
पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी हे पत्नीसह गायब झाले आहेत़ त्यांच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी परराज्यात पथके रवाना केली आहेत़
उच्च न्यायालयाने डीएसके यांना १९ डिसेंबरपर्यंत ५० कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले होते़ ते न्यायालयात पैसे जमा करणार का, याविषयी गुंतवणूकदार व फ्लॅटधारक यांच्यामध्ये उत्सुकता होती. अनेक गुंतवणूकदारही उच्च न्यायालयात आले होते़ १९ डिसेंबरला डीएसके हे स्वत: उच्च न्यायालयाच्या आवारात आल्याचे अनेकांनी पाहिले़
ते पैसे जमा करण्यासाठी आले असा सर्वांचा समज झाला़ कोल्हापूर येथील एका प्रकरणात सह्या करण्यासाठी ते आले होते़ त्यानंतर ते कोणाच्याही नकळत तेथून निघून गेले़ तोपर्यंत उच्च न्यायालयात हे प्रकरण सुरू न झाल्याने न्यायालयाचा नेमका निर्णय काय हे पोलिसांना समजू शकले नव्हते़
सायंकाळी वेळ संपत असताना न्यायालयाने आपले म्हणणे स्पष्ट केले़ त्यानंतर डीएसके यांची शोधाशोध सुरू झाली़ तोपर्यंत डीएसके अज्ञातस्थळी रवाना झाले होते़
न्यायालयाकडून डीएसके यांच्या अटकेला हिरवा झेंडा मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांची शोध मोहीम हाती घेतली़ पुणे व परिसरात त्यांनी बुधवारी शोध घेतला़
पण, ते कोठेही नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली आहेत़ ही पथके राज्यात इतरत्र तसेच परराज्यातही पाठविण्यात आली असल्याचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांनी सांगितले़