यंदा दहा वर्षांतील दुसरा नीचांकी साखर हंगाम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 05:43 AM2019-12-27T05:43:41+5:302019-12-27T05:44:01+5:30
९० दिवस चालेल : ५५ लाख टनावर उत्पादन घसरण्याचा साखर महासंघाचा अंदाज
पुणे : गेल्या वर्षीची दुष्काळी स्थिती व यंदाची अतिवृष्टी या कचाट्यात ऊस गाळप हंगाम सापडला आहे. गेल्या दहा वर्षांतील नीचांकी साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. साखर हंगाम केवळ ९० दिवस चालणार आहे. साखरेचे उत्पादन ५५ लाख टनापर्यंत घसरेल, असा अंदाज साखर महासंघाने वर्तविला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात ५२.२० लाख टनांची घट होईल.
देशातील एकूण ऊस क्षेत्रापैकी महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यात सुमारे ४० टक्के क्षेत्र आहे. यंदाच्या मॉन्सूनमध्ये आलेला पूर, अतिवृष्टी व गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने घटलेले ऊस क्षेत्र यामुळे या दोन राज्यांत ऊस पिकाला फटका बसला आहे. मराठवाडा व सोलापुरात ३० टक्के क्षेत्र घटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील गाळप हंगाम ९० व कर्नाटकातील गाळप हंगाम १०० दिवस चालेल. उत्तरप्रदेशातील साखर हंगाम संपूर्ण दीडशे दिवस होईल, असा अंदाज आहे. आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये राज्यात आलेल्या पूरामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यातील ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, २०१८-१९ या हंगामाच्या तुलनेत यंदा उसाचे क्षेत्र ११.५४ लाख हेक्टरवरुन ७.७६ लाख हेक्टरपर्यंत घटले आहे. त्यामुळे ६२ लाख टनापर्यंत साखर उत्पादन होईल असा अंदाज होता. मात्र, साखर उत्पादनात ५५ लाख टनापर्यंत घट होईल, असा सुधारित अंदाज आहे. असे झाल्यास २००९-१० पासूनचा हा दुसरा नीचांकी गाळप हंगाम ठरेल. या पुर्वी २०१६-१७मधे नीचांकी ४२ लाख टन साखर उत्पादन झाले होते. राज्यात २०१७-१८ व २०१८-१९ या हंगामात राज्यात १०७ लाख टनांहून अधिक साखरेचे उत्पादन झाले होते. सलग दोन वर्षांच्या विक्रमी साखर उत्पादनामुळे यंदाचा हंगाम सुरु होण्यापूर्वी राज्यात तब्बल ५४.७ लाख टन साखर शिल्लक होती. या हंगामातील साखरेच्या कमी उत्पादनामुळे शिल्लकी साखर बाजारात आणणे शक्य होईल, असे साखर संघातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या अकरा गाळप हंगामातील नीचांकी
सन ऊस गाळप साखर
२००८-९ ४०० ४६
२००९-१० ६१४.४७ ७१
२०१६-१७ ३७३.१ ३४२
(आकडेवारी लाख टन)
साखर उत्पादन व विक्री
साखर स्थिती २०१९-२० २०१८-१९
अंदाज प्रत्यक्ष स्थिती
साखर उत्पादन ५५ १०७.२
स्थानिक खप ७८ ७८.५
निर्यात १८ १५.५
हंगामअखेरची १३.७ ५४.७
शिल्लक
(आकडेवारी लाख टन)