Sanjay Kakade | मुंबई उच्च न्यायालयाचा संजय काकडेंना दणका; स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 10:25 AM2023-03-17T10:25:09+5:302023-03-17T10:25:09+5:30
याबाबतची पुढील सुनावणी दि. २७ मार्चला होणार आहे...
पुणे : माजी खासदार संजय काकडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. डीएचएफएल बँक कर्ज बुडविल्याप्रकरणी शिवाजीनगर येथील शिवाजी गृहनिर्माण सहकारी संस्था येथील सर्व्हे नं १०३, प्लॉट नं. ६२ या त्यांच्या मिळकतीसह बंगला जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पुढील आदेश येईपर्यंत बंगला प्रातिनिधिक स्वरूपात ताब्यात घ्यावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. याबाबतची पुढील सुनावणी दि. २७ मार्चला होणार आहे.
काकडे यांनी शिवाजी गृह निर्माण सहकारी संस्थेची मिळकत, बंगला आणि काकडे पॅराडाईज या तिन्ही स्थावर मालमत्ता लोकमंगल काे-ऑपरेटिव्ह बँक, इंडिया बुल्स हाऊसिंग प्रा. लि. आणि समता नागरी काे-ऑपरेटिव्ह बँक यांच्याकडे गहाण ठेवून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, त्या कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे बँकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने दि. २४ ऑगस्ट २०१८ रोजी कोर्ट रिसिव्हरची नियुक्ती करून काकडे यांची स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्याचे आणि त्याची विक्री करण्याचे अधिकार दिले आहेत.
त्यानुसार न्यायालयाने काकडे यांची शिवाजी गृहनिर्माण सहकारी संस्था येथील सर्व्हे नं १०३, प्लॉट नं. ६२ मिळकत जप्त करण्याचे आदेश दिले असून, त्याचा अहवाल आदेश दिल्यानंतरच्या दोन आठवड्यांत सादर करण्याचे आदेशात नमूद केले आहे. यात बंगला जप्त करण्याचे आदेश केवळ प्रातिनिधिक स्वरूपात दिले आहेत. न्यायालयाने आदेशात विधी महाविद्यालय रस्त्यावरील काकडे पॅराडाईजच्या स्थावर मालमत्तेचाही उल्लेख केला आहे. ही मालमत्ता ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, मात्र त्याची विक्री करण्यासंदर्भात सूचित केले जाईल, असे आदेशात म्हटले आहे.