पुणे: मराठी कलाविश्वात आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे आपल्या रोखठोक विधाने, भूमिका यांमुळे कायम चर्चेत असतात. शरद पोंक्षे सोशल मीडियावरही सक्रीय असतात. शरद पोंक्षे अनेकदा विविध राजकीय गोष्टींवर मत मांडताना दिसतात. यातच आता एका कार्यक्रमात बोलताना शरद पोंक्षे यांनी जातीयवादावर भाष्य करताना, जात संपविण्यासाठी ब्राह्मणांनी एकत्र येऊन पुढाकार घ्यायला हवा, असे मत मांडले आहे.
अनेक जातीयवाद्यांनी राज्यातील वातावरण गढूळ केले आहे. ते स्वच्छ करण्यासाठी ब्राह्मणांनीच पुढाकार घ्यायला हवा. फुले, शाहू, आंबेडकरांनीही समाजसुधारणा केली आहे. त्यात ब्राह्मणांचाही वाटा मोठा होता. मात्र, जात संपविण्यासाठी ब्राह्मणांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन शरद पोंक्षे यांनी केले आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर तरुण लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, बुलडाणा अर्बन क्रेडिट सोसायटीचे सीईओ शिरीष देशपांडे, नियतकालिकाचे मुख्य संपादक भालचंद्र कुलकर्णी व संचालक संजय ओर्पे उपस्थित होते.
देशात हिंदू हाच धर्म आणि माणूस हीच जात राहिली पाहिजे
जात संपवण्यासाठी ब्राह्मणांनाच पुढाकार घ्यावा लागेल, कारण या देशात फक्त हिंदू हाच धर्म आणि माणूस हीच जात राहिली पाहिजे. जाती-पातीचे राजकारण करणार्यांना त्यानंतर काही कामच उरणार नाही, अशी रोखठोक भूमिका ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी घेतली. आम्ही सारे ब्राह्मण या नियतकालिकाच्या वतीने ब्राह्मण भूषण पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. जातीच्या राजकारणाने महाराष्ट्र गढूळ झाला आहे. ब्राह्मण असण्याचा अभिमान नक्कीच आहे, मात्र त्याचा दुराभिमान असता कामा नये तसेच अन्य जाती-धर्माबद्दल सर्वांनाच आदर असायला हवा. शाहू, फुले, आंबेडकरांनी समाजसुधारणा निश्चितच केली आहे, त्याचबरोबर टिळक, कर्वे, सावरकर या ब्राह्मण असणार्यांनी देखील केली आहे, हे समजून घ्यायला हवे. ब्राह्मणांचा यात मोठा वाटा आहे. जातीभेद संपवण्यासाठी ब्राह्मणांनीच पुढे आले पाहिजे. कितीही वर्षे लागली तरी हे काम अखंडपणे करत राहिले पाहिजे, यश नक्कीच मिळेल. चांगली माणूस किंवा वाईट माणूस खरे तर या दोनच जाती आहेत, हे लक्षात घेतले तर अनेक प्रश्न संपतील. मी सावरकर भक्त असल्याने मला मुळातच जात हा प्रकारच आवडत नाही, असे शरद पोंक्षे यांनी नमूद केले. सुप्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी पोंक्षे यांची प्रकट मुलाखत घेतली. शरद पोंक्षे यांच्या मी आणि नथुराम या पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे लोकार्पण करण्यात आले.
दिग्पाल लांजेकर यांना इंदूमती-वसंत करिअर भूषण पुरस्कार
दिग्पाल लांजेकर यांना इंदूमती-वसंत करिअर भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. दिग्पाल लांजेकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वेगवेगळ्या आठ चित्रपंटाबाबत ते करीत असलेल्या अद्वितीय कार्याबाबत पुरस्कार देण्यात आला. नियतकालिकाच्या वतीने आगामी काळात गेल्या २०० वर्षातील ज्या ब्राह्मण व्यक्तींनी या देशासाठी अपूर्व असे योगदान व समर्पण दिले आहे, त्यावर ग्रंथ प्रकाशित करीत असल्याचे ओर्पे यांनी सांगितले व या कार्यक्रमात ग्रंथ नोंदणीचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.