तिकीटांसाठी ताटकळत उभे राहण्याच्या त्रासातून ज्येष्ठ नागरिक, अंध व्यक्तींची होणार सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 03:23 PM2018-02-06T15:23:46+5:302018-02-06T15:28:10+5:30
एस. टी. बसस्थानकांवर आरक्षित तिकीटांसाठी ताटकळत उभे राहण्याच्या त्रासातून ज्येष्ठ नागरिक व अंध व्यक्तींची सुटका होणार आहे.
पुणे : एस. टी. बसस्थानकांवर आरक्षित तिकीटांसाठी ताटकळत उभे राहण्याच्या त्रासातून ज्येष्ठ नागरिक व अंध व्यक्तींची सुटका होणार आहे. राज्यातील सर्व बसस्थानकांवर आरक्षण तिकीट खिडकीवर ज्येष्ठ व अंधांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था करण्याचा निर्णय एस. टी. महामंडळाने घेतला आहे.
एस. टी.च्या लांब पल्ल्याच्या विविध बसेससाठी बसस्थानकांवर आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच आॅनलाईन माध्यमातूनही आरक्षण करता येते. बसस्थानकांवरील आरक्षण खिडक्यांवर अनेकदा लांबलचक रांग लागते. अशावेळी ज्येष्ठ नागरिक व अंध व्यक्तींना रांगेत त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर एस. टी. प्रशासनाने ज्येष्ठ व अंधांसाठी आरक्षण खिडक्यांवर स्वतंत्र रांग करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत एस. टी.च्या वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी याबाबतचे परिपत्रक काढून सर्व विभाग नियंत्रकांना सूचना दिल्या आहेत.
ज्येष्ठ नागरिक व अंधांना आरक्षण खिडकीवर सर्वसाधारण रांगेत न उभे त्यांच्यासाठी निर्माण केलेल्या स्वतंत्र रांगेतून तिकिट देण्यात येईल. तसेच गर्दीच्यावेळी आरक्षण खिडकीवरील कर्मचाऱ्यांनी प्राधान्याने ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगाना तिकिटे द्यावीत विनाकारण त्यांना ताटकळत ठेऊ नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.