पुणे : ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. श्रीकांत शिवदे (वय ६७) यांचे दीर्घ आजाराने बुधवारी निधन झाले. गेल्या एक वर्षापासून ते कर्करोगाने आजारी होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे पत्नी आणि २ मुले असा परिवार आहे.
अॅड. श्रीकांत शिवदे यांनी ज्येष्ठ विधीज्ञ विजयराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आपला वकिली व्यवसाय सुरु केला. खासदार वंदना चव्हाण, अॅड. हर्षद निंबाळकर, अॅड. विराज काकडे, अॅड. विजय सावंत यांच्यासमवेत यांनी एकत्रित काम केले. पुणे बार असोशिएशनचे ते उपाध्यक्ष होते.
अॅड. शिवदे हे फौजदारी खटल्यात निष्णात वकील म्हणून नावाजले होते. लोकप्रिय अभिनेता सलमान खान यांच्याविरुद्धच्या बांद्रा येथील हिट अँड रन खटल्यात अॅड. शिवदे यांनी त्याची बाजू मांडली होती. प्रसिद्ध हिरे व्यापारी आणि फिल्म फायनान्सर भरत शहा यांच्याविरुद्ध अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलला मदत केल्याचा खटला त्यांनी लढविला होता. दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्यावर बलात्काराच्या खटल्यात ते वकील होते. मालेगाव बॉॅम्बब्लास्टमधील लेफ्टनंट प्रसाद पुरोहित यांचे ते वकील होते. बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्याविरुद्धच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर अॅड. शिवदे यांनी त्यांची बाजू मांडली होती.