पुणे : मराठीतील अभिजात साहित्यकृती अनुवादाद्वारे कन्नड भाषिकांपर्यंत पोहोचविणारे ज्येष्ठ अनुवादक विरुपाक्ष कुलकर्णी (वय ८१) यांचे कोरोनामुळे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी ज्येष्ठ अनुवादिका उमा कुलकर्णी आहेत. चार दिवसांपूर्वीच ते काश्मीर येथून पुण्यात परतले होते. मात्र त्यांना कोरोनाचे निदान झाले. घरातच विलगीकरणात ते राहत होते.मात्र, प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.
विरुपाक्ष कुलकर्णी यांनी संरक्षण खात्याच्या हाय एक्सप्लोजिव्हफॅक्टरीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअर म्हणून काम केले. वाचनाची त्यांना खूप आवड होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ’माझी जन्मठेप’ या पुस्तकाचा कन्नडमध्ये अनुवाद करून विरुपाक्ष यांनी अनुवाद क्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी मराठीतून कन्नडमध्ये केलेले वीस अनुवाद प्रकाशित झाले आहेत. पु. ल. देशपांडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य आणि बाबा आमटे यांच्या चरित्राचा त्यात समावेश आहे. सुनीता देशपांडे यांचे ‘आहे मनोहर तरी’, ’भैरप्पा-कारंथ लेखन समीक्षा’, विश्वनाथ खैरे यांचे ’मिथ्यांचा मागोवा’ या साहित्यकृती देखील त्यांनी अनुवादित केल्या आहेत. पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वाडमय’ या पुस्तकाचे संपादनही त्यांनी केले आहे.
मुंबई-कर्नाटक संघाचा वरदराजन आद्या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. पत्नी उमा कुलकर्णी यांना कन्नड साहित्यकृतींचा मराठी अनुवाद करण्यासाठी प्रोत्साहन देताना विरुपाक्ष यांनी आपले अनुवादाचे काम बाजूला ठेवले होते.