पुणे : अनंत यशवंत खरे ऊर्फ नंदा खरे यांचे आज पुण्यात निधन झाले. खरे हे मराठी भाषेतील एक प्रसिद्ध कादंबरीकार होते. त्यांच्या स्वतंत्र (व भाषांतरित) लेखनामध्ये समाजशास्त्रीय, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक विषयांना मध्यवर्ती स्थान दिलेले आढळते. ‘अंताजीची बखर’, ‘बखर अंतकाळाची’ आणि ‘उद्या’ ह्या त्यांच्या कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. विवेकवादी आणि विज्ञानाधारित भूमिकेचा सातत्याने पुरस्कार हा गुणविशेष त्यांच्या लेखनात ठळकपणे दिसून येतो. खरे यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील साहित्य विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
खरे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नागपुरात झाले. मॅट्रिकची परीक्षा १९६१ साली उत्तीर्ण झाल्यानंतर १९६२-६७ ह्या काळात त्यांनी मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ह्या संस्थेत सिव्हिल इंजीनियरिंगचे शिक्षण घेतले. तेथून B.Tech. (Honours, Civil) ही पदवी घेतल्यानंतर २००१ सालापर्यंत एका खाजगी कंपनीत ते सिव्हिल इंजीनियर होते. भीमा नदीवरील उजनी धरणाच्या बांधकामात त्यांचा मोठा वाटा आहे.
१९९३ ते २०१७ ह्या दरम्यान खऱ्यांनी ‘आजचा सुधारक’ ह्या विवेकवादी वैचारिक मासिकाच्या विश्वस्त मंडळावर काम केले. यापैकी २००० ते २०११ या काळात ते ‘कार्यकारी संपादक’ होते. त्याचप्रमाणे १९८४ ते १९९१ ह्या कालखंडात ते मराठी विज्ञान परिषदेशी संलग्न होते. विवेकवादी विज्ञानाचा प्रसार व्हावा ह्या हेतूने माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ते शैक्षणिक कार्यक्रम घेत असत.
पुरस्कार-
- ‘ज्ञाताच्या कुंपणावरून’ ह्या त्यांच्या हस्तलिखितास १९८५ साली ग्रंथालीचा विज्ञान पुस्तके/हस्तलिखिते यांसाठीचा द्वितीय पुरस्कार मिळाला.
- ‘वीसशे पन्नास’ ह्या विज्ञान कादंबरीस १९९५ साली विदर्भ साहित्य संघाचा गो.रा. दोडके स्मृती वाङ्मय पुरस्कार मिळाला.
- ‘कहाणी मानवप्राण्याची’ ह्या मानवशास्त्रविषयक ग्रंथास २०१० साली महाराष्ट्र शासनाचा भाई माधवराव बागल पुरस्कार व प्रियदर्शन अकॅडमीचा वार्षिक साहित्य पुरस्कार मिळाला.
- एकूण कादंबरीलेखनासाठी २०१४ साली ‘शब्द: द बुक गॅलरी’ ह्या संस्थेचा भाऊ पाध्ये पुरस्कार मिळाला.
- ‘उद्या’ ह्या कादंबरीला २०१५ साली लोकमंगल साहित्य पुरस्कार मिळाला.
यापुढे कोणतेही पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय सुमारे २०१७ साली त्यांनी घेतल्यामुळे २०२० साली ‘उद्या’ ह्या कादंबरीला जाहीर झालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांनी नाकारला. ह्या नकारामागे कोणतेही राजकीय कारण नसल्याने त्यांनी स्पष्ट केले.