बारामती शहरात भरवस्तीमध्ये लांडगा शिरल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:01 PM2018-03-22T23:01:40+5:302018-03-22T23:01:40+5:30
शहरात लांडगा घुसल्याचे पाहुन अनेकांची बोलतीच बंद झाली.
बारामती: ‘लांडगा आला रे आला पळा पळा पळा’ ची गोष्ट प्रसिध्द आहे. बारामतीकरांनी या गोष्टीचा अनुभव बुधवारी (दि २१) चक्क मध्यरात्री घेतला. सुरवातीला ‘लांडगा’ आल्याची चर्चा बारामती शहरात पसरली. अनेकांनी ‘लांडगा आला रे आला’ गोष्ट असल्याचे समजुन दुर्लक्ष केले. मात्र, प्रत्यक्ष शहरात लांडगा घुसल्याचे पाहुन अनेकांची बोलतीच बंद झाली. यावेळी या लबाड लांडग्याचा पाठलाग करुन भटक्या कुत्र्यांनी त्याची दमछाक केली. परंतु, शहरातील युवक,प्राणीमित्रांमुळे या लांडग्याला जीवदान मिळाले. बारामती शहरात भरवस्तीमध्ये बुधवारी(दि २१) मध्यरात्री लांडगा शिरल्याने खळबळ उडाली.कसाबगल्ली येथील ‘अलकुरेश’च्या युवकांनी प्रसंगावधान राखुन प्राणीमित्रांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर लांडग्याला पकडण्यात आले.गुरुवारी(दि.२२) या पकडलेल्या लांडग्याला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.लांडग्याला पकडल्यानंतर येथील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. बारामती शहर परिसरात एखादा वन्यप्राणी घुसल्याचा प्रकार घडला आहे.
कुत्र्यांनी पाठलाग केल्याने हा लांडगा बारामती शहरातील कसाब गल्ली येथील मस्जिदमध्ये शिरला.हा जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा असल्याचा भास सुरवातीला येथील नागरिकांना झाला. सूक्ष्म निरीक्षणानंतर हा कुत्रा नसुन लांडगा असल्याचे निदर्शनास आले.काहीजण या लांडग्याला लाकडी दांडके हातात घेवून मारण्यासाठी सरसावले. मात्र, तो सुध्दा एक पशु असुन त्याला जगण्याचा अधिकार असल्याची भुमिका येथील परवेज शेख,नदीम कुरेशी,सद्दाम शेख,गौस कुरेशी यांनी घेतली. त्यांनी यादगार सोशन फाउंडेशनचे प्रमुख फिरोज बागवान यांच्याशी संपर्क साधला.बागवान रात्री १२ वाजता या ठिकाणी पोहचले. त्यांनी प्रसंगावधान राखुन रात्रीच नेचर फ्रेंड्स आॅर्गनायझेशनचे प्रमुख बबलु कांबळे यांच्याशी संपर्क साधला.कांबळे हे देखील त्यांच्या सहकारी अक्षय गांधी, ऋषीकेश आगवणे,कार्तिक शहा,श्रेयस कांबळे,अक्षद शहा,सचिन कांबळे,सचिन जानराव यांच्यासह याठिकाणी पोहचले.कांबळे यांनी लांडग्याला दोरीच्या साहाय्याने कंबरेचा फास तयार केला.त्याला पिंजऱ्यामध्ये सुखरुप बंद करण्यात यश आले. रात्री उशिरा या लांडग्याला यादगार सोशल फाउंडेशनचे बागवान यांच्याकडे असणाऱ्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले.त्याला खाद्य,पाणी उपलब्ध करण्यात आले.लांडगा आल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाला समजल्यानंतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे,अग्निशामक विभागाचे प्रमुख विजय शितोळे,मोहन शिंदे आदी याठिकाणी पोहचले.