पुणे : महापालिकेत मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या स्मार्ट सेविकांना अचानक कामावरून कमी केल्याने त्यांच्यासाठी आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका रूपाली पाटील यांनी मंगळवारी महापालिकेचा टेरेस गाठून त्यावर आंदोलन केले. कामावर घेतल्याचा शब्द द्या, नाहीतर इथून खाली उडी मारेल या त्यांच्या इशाऱ्याने महापालिकेत भर दुपारी खळबळ उडाली.गेले अनेक दिवस रूपाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेला महिनाभर या स्मार्ट सेविका महापालिकेत चकरा मारत आहेत. मात्र त्यांच्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. सर्व पदाधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्यांना फक्त आश्वासनेच मिळत आहेत. मात्र प्रशासन काहीच हालचाल करायला तयार नाही. सलग १५ वर्षे करत असलेले काम असे अचानक गेल्यानंतर या सर्व महिला हवालदील झाल्या आहेत. त्यामुळे रूपाली पाटील, माजी नगरसेविका युंगधरा चाकणकर यांनी मंगळवारी दुपारी महापालिका मुख्य इमारतीच्या टेरेसवर जाऊन आंदोलन सुरू केले.आपत्ती निवारण कक्षाच्या समोर महापालिकेचा हा टेरेस आहे. त्यावर चढून त्यांनी घोषणा देण्यास सुरूवात केली. थोड्याच वेळात महापालिकेचे अधिकारी तिथे आले. त्यांनी पाटील व चाकणकर यांना खाली येण्याची विनंती केली. मात्र प्रशासन प्रमुख आल्याशिवाय येणार नाही असे त्यांनी सांगितले. अखेरीस आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त आयुक्त शीतल ऊगले-तेली यांनी त्यांना २५ जानेवारीपर्यंत यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी आंदोलन थांबवले व त्या खाली आल्या. अच्छे दिन चे आश्वासन देत निवडून आलेल्या एकाही पदाधिकाऱ्याला या बेरोजगार स्मार्ट महिलांबरोबर चर्चा करण्याची इच्छा झाली नाही याबद्धल पाटील यांनी खंत व्यक्त केली.
‘कामावर घेतल्याचा शब्द द्या, नाहीतर इथून उडी मारेल..’; पुणे महापालिकेत खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 2:52 PM
महापालिकेत मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या स्मार्ट सेविकांना अचानक कामावरून कमी केल्याने त्यांच्यासाठी आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका रूपाली पाटील यांनी मंगळवारी महापालिकेचा टेरेस गाठून त्यावर आंदोलन केले.
ठळक मुद्देरूपाली पाटील, माजी नगरसेविका युंगधरा चाकणकर यांनी मंगळवारी केले आंदोलन स्मार्ट या संस्थेत एकूण २३० जण असून त्यात २०० महिला व ३० जण पुरूष