पुणे : जखमी झालेल्या किंवा एखाद्या आजाराने ग्रस्त असलेल्या पक्ष्यांना वेळेत उपचार मिळत नाहीत. मुळात त्यांच्यावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र रुग्णालय किंवा व्यवस्थाच नाही. त्यामुळे अनेकदा योग्य उपचाराअभावी पक्षांचा जीव जातो. यापार्श्वभुमीवर शहरामध्ये केवळ पक्ष्यांवर उपचार करणारे स्वतंत्र रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांसह अतिदक्षता कक्ष, शस्त्रक्रिया कक्ष यांसह सर्व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांनी या रुग्णालयासाठी पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयात पक्ष्यांवरील सर्व उपचार मोफत केले जातील. पुढील दीड-दोन वर्षात हे रुग्णालय सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. देशातील पक्ष्यांचे पहिले रुग्णालय ४०० वर्षांपुर्वी दिल्ली येथील लाल किल्ल्यासमोरील दिंगबर जैन मंदीर परिसरात सुरू करण्यात आले आहे. आजही हे रुग्णालय सुरू असून पक्ष्यांवर उपचार केले जात आहेत. त्यानंतर देशात असे स्वतंत्र रुग्णालय सुरू झाल्याचे ऐकिवात नाही. विविध कारणांमुळे पक्षी जखमी होत असतात. विद्युत तारा, पतंगाच्या मांजामध्ये अडकणे, दगड मारणे आदी कारणांमुळे पक्षी जखमी होतात. तसेच विविध आजारांमुळेही पक्षांचा मृत्यू ओढवू शकतो. पण अशा पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी पक्षीमित्रांना सध्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातच जावे लागते. तिथे उपचार होत असले तरी त्याला खुप मर्यादा असल्याचे पक्षीतज्ज्ञांचे म्हणणे आहे. याविषयी ‘लोकमत’शी बोलताना गंगवाल म्हणाले, अनेकदा जखमी पक्ष्यांचे पाय, पंख तुटलेले असतात. या पक्ष्यांवर उपचार झाले तरी त्यांना लगेच सोडून देता येत नाही. त्यांना पुर्ण बरे करूनच सोडणे अपेक्षित असते. किंवा त्यांचा अखेरपर्यंत सांभाळ होणे आवश्यक आहे. पण सध्या महाराष्ट्रात कुठेही पक्ष्यांसाठी स्वतंत्र रुग्णालय नाही. त्यामुळे रुग्णालय उभारण्याचा संकल्प केला आहे. या रुग्णालयामध्ये पक्ष्यांसाठी आयसीयु, शस्त्रक्रिया कक्षा यांसह सर्व सुविधा असतील. पक्षी रुग्णालयात आल्यानंतर तो पुर्ण बरा होईपर्यंत सांभाळ केला जाईल. त्यानंतरच त्याला मुक्त केले जाईल. तसेच पक्ष्यांबाबत जनावरांच्या डॉक्टरांनाही पुरेसे ज्ञान नसते. त्यामुळे या डॉक्टरांना त्याबाबतचे पुर्ण प्रशिक्षणही दिले जाईल. पक्षांबद्लची सर्व आवश्यक माहिती देण्याची सोयही रुग्णालयात केली जाईल. पुढील दीड-दोन वर्षात हे रुग्णालय उभे करण्याचा प्रयत्न आहे. -----------------
मकर संक्रातीनंतर आतापर्यंत ८९ पक्ष्यांना वाचविले आहे. दरवर्षी या कालावधीत जखमी होणाºया पक्ष्यांचा आकडा वाढत आहे. वर्षभरात शेकडो पक्ष्यांना राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात दिले जाते. पण पुढे त्या पक्ष्यांचे काय होते कळत नाही. पक्ष्यांवर उपचारासाठी कुठेही स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे रुग्णालय झाल्यास अनेक जखमी पक्ष्यांचे प्राण वाचविता येतील. - संतोष थोरात, पक्षीमित्र