पुणे : राज्यात तलाठी पदाच्या परीक्षेत सर्व्हरमधील तांत्रिक समस्येमुळे सुमारे ११६ केंद्रावरील पहिल्या सत्रातील परीक्षार्थींना मोठा फटका बसला. मात्र, ही परीक्षा घेणाऱ्या टाटा कन्सलटन्सी सर्विसेस कंपनीच्या हार्डवेअरमधील या समस्येमुळे सुमारे सव्वातास उशीर झाला. सर्व परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थींना तेवढा वेळ वाढवून देण्यात आली. त्यानंतर ही परीक्षा सुरळीत झाली, असे स्पष्टीकरण तलाठी परीक्षेचे राज्य समन्वयक व अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आनंद रायते यांनी दिली.
राज्यात तलाठी पदासाठी १७ ऑगस्टपासून विविध जिल्ह्यांमध्ये परीक्षा सुरू आहे. त्यानुसार सोमवारी (दि. २१) सकाळच्या सत्रात ९ ते ११ या वेळेत ही परीक्षा राज्यभर घेण्याचे नियोजन होते. मात्र, ही परीक्षा घेणाऱ्या टाटा टाटा कन्सलटन्सी सर्विसेस (टीसीएस) कंपनीच्या डेटा सेंटरच्या सर्व्हरमध्ये अचानक तांत्रिक समस्या उद्भवली. परीक्षा ९ वाजता सुरू न झाल्याने परीक्षार्थींनी अनेक केंद्रांवर गोंधळ घातला. ही समस्या मूळ सर्व्हरमध्येच निर्माण झाल्याने परीक्षा उशिराने सुरू होऊ शकते, असे कंपनीने जमाबंदी विभागाला तसे कळविले. त्यानुसार सर्व उमेदवारांना याबाबत सांगण्यात आले. टीसीएस कंपनीच्या वतीने महाराष्ट्रासह देशभरात विविध राज्यांमधील विविध प्रकारच्या परीक्षा घेण्यात येत होत्या. कंपनीने ही तांत्रिक समस्या शोधून काढल्यानंतर सव्वादहाच्या सुमारास परीक्षा सुरू झाली. त्यानंतर सर्व जिल्ह्यांच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून पहिल्या सत्रातील या विद्यार्थ्यांना तशी वेळही वाढवून देण्यात आली. अनेक केंद्रावर सव्वातास ते दोन तास उशीर झाल्यानंतर ही परीक्षा सुरळीत सुरू झाल्याचे रायते यांनी सांगितले.
सोमवारी झालेल्या परीक्षेसाठी १७ हजार ४५६ परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. मात्र प्रत्यक्षात १४ हजार ८३४ जणांनी परीक्षा दिली आहे. आतापर्यंत झालेल्या परीक्षांमध्ये सोमवारच्या परीक्षार्थींची संख्या अधिक आहे. त्यामुळे कोणत्याही परीक्षार्थीचे नुकसान झाले नाही, असा दावा करण्यात आला.
दुपारनंतर सर्व परीक्षा सुरळीत सुरू
तलाठी पदासाठी सोमवारी सकाळी परीक्षा सुरु होण्यास सुमारे सव्वातास उशीर झाला. मात्र, कोणत्याही उमेदवाराचे नुकसान होऊ दिले नाही. परीक्षा पुन्हा उशिरा सुरू झाली असली तरी प्रत्येकाला पुरेसा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे दुपारनंतर सर्व परीक्षा सुरळीत सुरू झाल्या. - आनंद रायते, तलाठी परीक्षा समन्वयक व अतिरिक्त जमाबंदी आयुक्त
विध्यार्थ्यांना परीक्षा देण्याआधी मानसिक त्रास
तलाठी भरतीच्या पाचव्या दिवशी सकाळच्या सत्रातील पेपर चालू होण्याआधी टीसीएस कंपनी चे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे राज्यभरातील विद्यार्थी गोंधळून गेले. परीक्षेतील घाेळ थांबत नाही. यापूर्वी जालन्यातील विद्यार्थ्यांना गडचिरोली, वर्धा सेंटर दिले. अमरावतीचे विद्यार्थ्यांना कोल्हापूर सेंटर आले आहे. एक हजार रुपये परीक्षा शुल्क भरून देखील विध्यार्थ्यांना परीक्षा देण्याआधी मानसिक त्रास सहन करावा लागतो ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. - महेश घरबुडे. कार्याध्यक्ष , स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, पुणे