इनोव्हेशनसाठी १० केंद्रे उभारणार; सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा बृहत आराखडा मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 04:53 AM2018-08-24T04:53:08+5:302018-08-24T04:53:30+5:30
आराखडा अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात येणार
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०१९-२० ते २०२३-२४ या पाच वर्षांच्या बृहत आराखड्याला विद्यापीठाकडून गुरुवारी मंजुरी देण्यात आली. हा आराखडा अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. यात अनेक बाबींचा समावेश असून, इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन हबची १० केंदे्र स्थापन करण्यात येणार आहेत.
विद्यापीठाच्या गुरुवारी झालेल्या व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषदेच्या बैठकीत आराखड्यात मंजुरी देण्यात आली. विस्तार, समावेशकता, कौशल्यविकास, रोजगारनिर्मिती, नवनिर्मिती, उद्योजकता विकास, समाजोपयोगी-उद्योगोपयोगी संशोधन, गुणवत्ता हे निकष डोळ्यासमोर धरून आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, संस्थाचालक, उद्योग-व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते याची मते गृहित धरण्यात आली आहेत. विविध सदस्यांच्या सुचनांनुसार त्यात आवश्यक ते बदलही करण्यात आले आहेत, असी माहिती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी दिली.
विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार आराखड्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करण्यात आला आहे. एनआरआरएफ रँकिंगमध्ये विद्यापीठ पाचव्या स्थानावर नेणे, विद्यापीठाचा ग्रॉस एन्रॉलमेंट रेशो ३५ टक्क्यांवर नेणे, २०२४ सालापर्यंत विद्यापीठाच्या सर्व परीक्षांचे निकाल ३० दिवसांत लावणे, कमवा व शिका या योजनेचा लाभ ५० हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, कौशल्य विकास अभ्यासक्रमांची संख्या १०० पर्यंत वाढविणे, सर्वच विद्याशाखांच्या एकूण अभ्यासक्रमांपैकी निम्म्याहून अधिक अभ्यासक्रमांना इंटर्नशीप सक्तीची करणे, प्लेसमेंट सेलची सध्या ४३९ वरून ८५० करणे, समुपदेशन व मार्गदर्शन केंद्रांची संख्या सध्या ४०० वरून ८०० करणे, खेळांमध्ये गुणवत्ता वाढवण्यासाठी मूलभूत सोयी-सुविधांबरोबरच खेळाडूंना विशेष प्रशिक्षण देणे, अशा विविध शिफारशी करण्यात आल्या आहेत.
दिव्यांग व विशेष मुलांसाठी महाविद्यालय
पाच वर्षांत पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात एकूण ५८ नवी महाविद्यालये सुरू केली जातील. त्यामध्ये एका दिव्यांग व विशेष मुलांसाठीच्या महाविद्यालयाचाही समावेश असणार आहे. नवीन महाविद्यालयांमध्ये कला, विज्ञान, वाणिज्यबरोबरच अॅनिमेशन, एव्हिएशन, फॅशन डिझाईन, फाईन आर्ट्स, सोशल वर्क या विषयांचा समावेश असेल. तसेच महिलांसाठी, आदिवासी भागासाठी तसेच, रात्रीच्या वेळीचे (नाईट कॉलेज) असे प्रत्येकी एकेक महाविद्यालय सुरू केले जाईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.