गावागावांत पर्जन्यमापक बसविणार

By Admin | Published: May 28, 2016 04:18 AM2016-05-28T04:18:21+5:302016-05-28T04:18:21+5:30

सध्या जिल्हात मंडलावर आधारित पाऊस मोजला जातो. त्यामुळे आणेवारीत फरक पडत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने गावागावांत पर्जन्यमापक यंत्रणा

To set up Rainfall in the villages | गावागावांत पर्जन्यमापक बसविणार

गावागावांत पर्जन्यमापक बसविणार

googlenewsNext

पुणे : सध्या जिल्हात मंडलावर आधारित पाऊस मोजला जातो. त्यामुळे आणेवारीत फरक पडत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने गावागावांत पर्जन्यमापक यंत्रणा बसविण्याच्या विचारात आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी केले.
हवेली तालुका खरीप हंगाम टंचाई बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेत शरदचंद्र सभागृहात गुरुवारी ही बैैठक झाली. सध्या काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे. आणेवारीवर आधारित शासन ती जाहीर करते. आणेवारी त्या गावात पाऊसमान किती झाला यावर ठरविली जाते. मात्र, जिल्ह्यात पाऊस मोजण्याची यंत्रणा सक्षम नाही. मंडलावर असलेल्या यंत्रणेतून पाऊस गृहीत धरला जातो. त्यामुळे काही गावांत कमी पाऊस पडला व जिथे यंत्रणा आहे तेथे जास्त पाऊस पडला, तर हाच पाऊस त्या गावाला लागू होतो. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.
या सर्व गोष्टींचा विचार करून जिल्हा परिषद प्रत्येक गावात पर्जन्यमापक बसविण्याच्या विचारात आहे. पुरवणी बजेटच्या अगोदर जर यासाठी किती निधी लागू शकतो हे समजले तर निधी ठेवता येईल. त्यामुळे अधिकाऱ्यांनी याचे इस्टिमेट तयार करावे, असे आवाहन कंद यांनी या वेळी केले.
या बैैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दौैलत देसाई, महिला व बालकल्याण सभापती वंदना धुमाळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, जिल्हा परिषद कृषी अधिकारी सुनील खैरनार, हवेली पंचायत समिती सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

हवेली तालुक्यात १ लाख वृक्षलागवड करणार
यंदा शासनाने २ कोटी वृक्षलागवड करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यात १ लाखापेक्षा अधिक वृक्षलागवड करून जिल्ह्यात आमचा तालुका पहिल्या क्रमांकावर राहील, असे आश्वासन या वेळी कंद यांनी हवेलीकरांच्या वतीने दिले. त्यांनी उपस्थितांना आवाहन करीत तालुक्यात सर्वाधिक वृक्ष लागले पाहिजेत, एकही सरकारी जागा शिल्लक राहता कामा नये, ग्रामसेवकांनी आतापासूनच कामाला लागावे, असे सांगितले.

आता रब्बी हंगामापूर्वीच कृषी मेळावे
दरवर्षी जिल्ह्यात मार्चअखेर कृषी मेळावे घेतले जातात. मात्र आता रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वी तेही प्रत्येक तालुक्यात कृषी मेळावे घेतले जातील. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जाईल, असेही कंद यांनी सांगितले.

पावतीचा आग्रह धरा
बी बियाणे, खते दुकानातून घेताना शेतकऱ्यांनी पावतीचा आग्रह धरावा. पुढे बियाणांची तक्रार होते, तेव्हा पावती गरजेची असते, असे कृषी अधिकारी सुनील खैरनार यांनी आवाहन केले. दुकानदारांनी हलगर्जीपणा करू नये, तसे आढळल्यास त्यांचे परवाने रद्द केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: To set up Rainfall in the villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.