सातशे चौरस फुटांच्या फ्लॅटला मिळकतकर नको, शिवसेनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 03:14 AM2018-03-20T03:14:14+5:302018-03-20T03:14:14+5:30
मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पुण्यातदेखील ७०० चौरस फुटांच्या सदनिकांना कायमस्वरूपी मिळकतकर माफ करण्याची व ५० लाख पुणेकरांंच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पूर्णवेळ आरोग्य अधिकारी त्वरित नियुक्त करण्याची मागणीसाठी सोमवारी शिवसेनेच्या वतीने महापालिका भवनासमोर आंदोलन केले.
पुणे : मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पुण्यातदेखील ७०० चौरस फुटांच्या सदनिकांना कायमस्वरूपी मिळकतकर माफ करण्याची व ५० लाख पुणेकरांंच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पूर्णवेळ आरोग्य अधिकारी त्वरित नियुक्त करण्याची मागणीसाठी सोमवारी शिवसेनेच्या वतीने महापालिका भवनासमोर आंदोलन केले. या वेळी निवेदन देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांनी महापौर मुक्ता टिळक यांना घेराव घातला.
शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई, ठाणे महापालिकेतील नागरिकांना शिवसेनेने वचन दिल्याप्रमाणे ५०० चौरस फुटांपर्यंत सदनिकांना पूर्ण मिळकतकर माफी आणि ७०० चौरस फुटांपर्यंत घरांना करसवलत देण्याचे वचन दिले. त्याप्रमाणे २०१७मध्ये करमाफीचा ठरावही मंजूर करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनेदेखील शहरातील ७०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने केली. शहरामध्ये स्वाइन फ्लू, गॅस्ट्रो, डेंग्यू, रेबिज यासारख्या साथीच्या आजारांमुळे पुणेकर हैराण झाले असताना पुणे महापालिकेला पूर्णवेळ आरोग्य प्रमुख मिळत नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत पूर्णवेळ आरोग्य प्रमुख न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारादेखील दिला. या वेळी शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, महापालिका शिवसेना गटनेते संजय भोसले, सविता मते, संगीता ठोसर यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.