पुणे : पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा आधीच उडलेला. त्यात दिवाळीची भर पडली आहे. लाखो लोक रिक्षा, दुचाकी, चारचाकीने लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता परिसरात गर्दी करत आहेत. अरुंद रस्ता, त्यात दुतर्फा पार्किंग यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे.
गेल्या ४-५ दिवसांपासून पुण्यातील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. दिवाळीनिमित्त लाखो नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडत असून, त्यांना काेंडीचा सामना करावा लागत आहे. या कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांचे पथक १२ तासांपेक्षा अधिक वेळ काम करत आहे. मात्र, कोंडी हाेऊच नये यासाठी पाेलिसांनी आधीच नियोजन करणे गरजेचे हाेतेे, असे मत वाहतूक तज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. पोलीस यंत्रणा काम करत असताना नागरिकांनीही त्यांना सहकार्य आणि वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे मत काही वाहतूक पोलिसांनी व्यक्त केले.
७०० कर्मचारी रस्त्यावर
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या असून, दुपारनंतर वाहतूक पोलिसांची कुमक वाढवली जात आहे. पुणे वाहतूक पोलीस दलात एक पोलीस उपायुक्त, सहायक उपायुक्त, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कर्मचारी असे ९५० पोलीस अधिकारी-कर्मचारी आहेत. त्यापैकी दररोज ७०० पेक्षा अधिक अधिकारी-कर्मचारी वाहतूक नियमन करत आहेत.
२५ टोईंग व्हॅन
दुतर्फा वाहने उभे करण्याचे प्रमाण अधिक असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. पोलीस या वाहनांना टोईंग व्हॅनद्वारे उचलून नेत आहेत. पोलिसांकडे ९ टोईंग व्हॅन माेटार उचलण्यासाठी आणि १६ टोईंग व्हॅन दुचाकी उचलण्यासाठी आहेत. पण गर्दी प्रचंड असल्याने वाहने नेणार किती यालादेखील पोलिसांना मर्यादा येत आहेत. पोलीस दलातील वरिष्ठांनी शहरातील इतर पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील संध्याकाळच्या वेळी वाहतूक नियमन करण्याचे आदेश दिले आहेत.
पे अँड पार्कची संख्या वाढवणे
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पीएमपीची सेवा अधिक मजबूत करण्याची गरज आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांचे प्रमाण कमी होईल. लोकांनीदेखील कमी अंतरावर जाण्यासाठी वाहनाचा वापर करणे टाळले पाहिजे. भांडारकर रस्त्यासह अनेक ठिकाणी लोक फूटपाथवर वाहने उभी करत असल्याने पे अँड पार्कची संख्या वाढवणे गरजेचे आहे, जेणेकरून पुणेकरांना शिस्त लागेल आणि वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होईल. - प्रांजली देशपांडे, वाहतूक तज्ज्ञ