पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भीम शाहीर वामनदादा कर्डक यांसारख्या अनेक दिग्गज शाहिरांची परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. या सर्वांनी शाहिरी परंपरा जतन करण्यासाठी प्रयत्न केले. शाहिरीतून त्यांनी महापुरूषांचा इतिहास लोकांपर्यंत पोहचवला. या सर्वांनी शाहिरीची मोठी कला देशाला दिली आहे. शाहिरीमध्ये समाज परिवर्तनाची ताकद आहे, ही कला आपण जतन केली पाहिजे’, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुुख डॉ. सुनील भंडगे यांनी केले. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे व डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत पोवाडे प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, प्रबोधिनीचे शाहीर हेमंत मावळे, होनराज मावळे, राजकुमार गायकवाड, जालिंदर शिंदे, मुकुंद कोंडे, सुरेश तरलगट्टी आदी उपस्थित होते. पोवाडा प्रशिक्षण वगार्चे यंदाचे २० वे वर्ष आहे. वाद्यांचे पूजन करून प्रशिक्षण वगार्ची सुरूवात करण्यात आली. भंडगे म्हणाले, ‘शाहीरामध्ये कलाकाराबरोबर एक शिक्षक दडलेला असतो. समाज परिवर्तनाबरोबरच विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम ते आपल्या कलेतून करीत असतात. परंतु ही कला आनंदाने ती आत्मसात केली तर ती भविष्यकाळात टिकेल आणि त्याचे फायदे दिसतील.’ आनंद सराफ म्हणाले, ‘उन्हाळयाच्या सुट्टीत पालक हजारो रुपये देऊन मुलांना संस्कार वर्ग, शिबीरामध्ये पाठवितात. परंतु, त्या शिबीरांमध्ये त्यांना काय शिकायला मिळते ही महत्वाची गोष्ट तपासून पाहत नाहीत. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे शाहिरी कला जपण्याबरोबरच विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाते. या कलेमध्ये उत्तम नागरीक घडविण्याची ताकद आहे.’प्रा. संगिता मावळे यांनी सूत्रसंचालन केले, शाहीर हेमंत मावळे यांनी प्रास्ताविक केले. गणेश टोकेकर यांनी आभार मानले.